पुणे, दि.१२: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील शासकीय वसतीगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२६-२०२७ करीता प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. इयत्ता १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच संबंधित पात्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कालावधीत निवास व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विभागामार्फत शासकीय वसतीगृह योजना राबविण्यात येत आहे.
प्राप्त अर्जांची ७ सप्टेंबर पर्यंत छाननी होऊन ८ सप्टेंबर रोजी पहिली अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १८ सप्टेंबर पर्यंत मुदत राहील. तर रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची दुसरी निवड यादी २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करून ३० सप्टेंबर पर्यंत प्रवेश देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह विभागाच्या ऑनलाईन प्रणाली https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर विहित कालावधीत अर्ज सादर करावेत. प्राप्त अर्जाची छाननी, गुणवत्तेनुसार निवड प्रक्रिया व प्रवेश निश्चितीचे काम नियोजित वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप संकपाळ यांनी कळविले आहे.

