अमली पदार्थ विरोधी पथक-२ ची कारवाई; राजस्थानातील बसचालकासह वाहनमालकाच्या मुलाकडून माल ताब्यात
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-२ ने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत १ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचा बनावट मावा जप्त केला आहे. ही कारवाई ९ ऑगस्ट रोजी करण्यात आल्याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक-२ चे अधिकारी व कर्मचारी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत असताना काकडे वस्ती येथील करणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या नैनिताल ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बनावट मावा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने बसची तपासणी केली. संबंधित बसचा क्रमांक RJ-11/E/2001 असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पांढऱ्या रंगाचा मावा जप्त
तपासणीदरम्यान बसमधून १ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा मावा ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणात बसचालक इंदरसिंग लाडूसिंग, वय ४२, रा. रामपुरा, तहसील रायपूर, जि. पाली, राजस्थान तसेच वाहनमालकाचा मुलगा नरेश दिनेश नेनिवाल, वय २३, रा. इंद्र कॉलनी, बिलारा, जि. जोधपूर, राजस्थान यांच्याकडून माल ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
अमली पदार्थ विरोधी पथक-२ ची संयुक्त कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही या कारवाईत सहभाग असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

