पुणे : नायजेरियातील लागोस येथे झालेल्या २३ वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्ट्रीय तलवारबाज तेजस पाटीलने फॉइल प्रकारात रौप्यपदक पटकावत विद्यापीठाचा मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे. यासोबतच तेजसने वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेतील फॉइल प्रकारातही कांस्यपदक पटकावले आहे.
२३ वर्षांखालील वैयक्तिक फॉइल प्रकारात तेजसने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत इंग्लंडच्या ऑलिव्हर स्टोनकडून तेजसला १५-१३ असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या दमदार कामगिरीमुळे त्याने रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
वरिष्ठ गटातील स्पर्धेतही तेजसने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. उपांत्य फेरीत त्याला सायप्रस प्रजासत्ताकच्या ॲलेक्स टोफालिडेसकडून १५-१२ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
यापूर्वी तेजसने आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील पुरुष फॉइल सांघिक प्रकारात आठवे स्थान मिळवले होते. तसेच चीनमधील शांघाय येथे झालेल्या फॉइल ग्रँड प्रिक्स आणि नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने सहभाग नोंदवला आहे. त्यानंतर तेजसची ऑक्टोबरमध्ये जपानमधील नागोया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनिता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि छत्रपती शिवाजी पुरस्कारप्राप्त क्रीडा विभाग संचालक प्रा. पद्माकर फड यांनी तेजसचे अभिनंदन केले आहे.

