पुणे, दि. ७ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र राज्याच्या मा. राज्यमंत्री (नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ) श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहरातील वाहतूक, रस्ते, खड्डे, अतिक्रमण तसेच कचरा व्यवस्थापना संदर्भात आज आढावा बैठक पार पडली. यावेळी नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या तसेच शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीमध्ये मंडईच्या भाडेवाढी बाबत तसेच मेट्रो प्रकल्पा मार्फत तयार करण्यात आलेल्या गाळ्यांच्या वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. मेट्रोच्या विविध कामांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच कामानंतर रस्त्यांवर पडून राहिलेला राडारोडा तातडीने हटवून रस्ते पूर्ववत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
शहरातील अनधिकृत पथ विक्रेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, अतिक्रमण विभागाने अनधिकृत पथ विक्रेत्यांवर नियमानुसार प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच एकता नगर, निंबस नगर आणि विठ्ठलवाडी परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या प्रगतीतील अडचणी दूर करून कामाला गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कचरा विलगीकरणाची प्रक्रिया अधिक वेगवान व कार्यक्षम पद्धतीने राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. कचरा संकलन व व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करून नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
सिंहगड परिसरातील भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन रस्त्यांशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित पायाभूत सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून शहरातील विकासकामांना गती देण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.
या बैठकीस .आमदार श्री. हेमंत रासने (कसबा विधानसभा), मा.आमदार श्री.भीमराव तापकीर (खडकवासला मतदारसंघ), मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे, मा.उपमहापौर श्री.परशुराम वाडेकर, मा सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री.श्रीनाथ भिमाले, मा.सभासद , मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(इस्टेट) श्री. प्रजित नायर, मेट्रो प्रकल्प व्यवस्थापक श्री. धनंजय गाडगीळ तसेच पुणे महानगरपालिकेचे विविध विभागांचे मा.खातेप्रमुख, मा.उपायुक्त, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

