महापालिकेतील ३१ माजी विरोधी पक्षनेत्यांपैकी २२ जण हयात; प्रारंभिक बैठकीला नऊ जणांची उपस्थिती
पुणे, दि. ५ ऑगस्ट — माय मराठी प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेतील माजी महापौर आणि माजी उपमहापौर यांच्या संघटनांनंतर आता शहरातील माजी विरोधी पक्षनेत्यांनीही एकत्र येत ‘पुणे विरोधी पक्षनेते संघटना’ स्थापन केली आहे. पुणेकरांच्या समस्या, रखडलेले विकास प्रकल्प, वाहतूक कोंडी आणि महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी ही सर्वपक्षीय संघटना कार्यरत राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
पुणे महापालिकेत आतापर्यंत ३१ जणांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले असून, त्यापैकी २२ माजी विरोधी पक्षनेते सध्या हयात आहेत. संघटनेच्या प्रारंभिक बैठकीला नऊ माजी विरोधी पक्षनेते उपस्थित होते.
या बैठकीला आबा बागुल, नीलेश निकम, आमदार चेतन तुपे, अविनाश साळवे, सुहास कुलकर्णी, उज्ज्वल केसकर, वसंत मोरे, दत्ता सागरे आणि दीपाली धुमाळ उपस्थित होते.
चुकीच्या कामांना विरोध केला — चेतन तुपे
आमदार चेतन तुपे म्हणाले, “आमच्या कार्यकाळात शहराच्या विकासाला प्राधान्य दिले. महापालिकेत जे चुकीचे सुरू होते, त्याला विरोध केला. विरोधी पक्षाची भूमिका केवळ विरोध करण्याची नसून योग्य विकासकामांना पाठिंबा देण्याचीही आहे.”
विरोधकांना विश्वासात घेऊन काम करा — आबा बागुल
माजी विरोधी पक्षनेते आबा बागुल यांनी महापालिका प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेऊ नयेत, अशी भूमिका मांडली. “कोणतीही कामे रेटून नेऊ नका. विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत. शहरातील अनेक प्रकल्प रखडले असून, ते मार्गी लागले पाहिजेत. सर्वांचा केंद्रबिंदू पुणे शहराचा विकास असला पाहिजे,” असे बागुल म्हणाले.
वाहतूक समस्येवर सभागृहात आवाज नाही — वसंत मोरे
वसंत मोरे यांनी पुण्यातील गंभीर वाहतूक समस्येकडे लक्ष वेधले. “पुणे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या प्रश्नावर महापालिकेच्या सभागृहात प्रभावीपणे आवाज उठवला जात नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रशासनावरील वचक कमी झाला — सुहास कुलकर्णी
सुहास कुलकर्णी म्हणाले, “पूर्वी विरोधी पक्षाची बाजू ऐकून घेतली जात होती आणि प्रशासनावर विरोधकांचा वचक होता. गेल्या काही वर्षांत शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या असून प्रशासनावरील वचक कमी झाला आहे.”
ही संघटना पूर्णपणे सर्वपक्षीय असून, त्यामध्ये कोणतेही राजकीय मतभेद ठेवले जाणार नाहीत. प्रत्येक महिन्यात किमान एक बैठक घेऊन पुणेकरांच्या हिताचे प्रश्न प्रशासन आणि राजकीय पदाधिकाऱ्यांसमोर मांडले जातील. संवाद आणि पाठपुराव्याच्या माध्यमातून ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
सर्वजण एकत्रितपणे काम करू — दीपाली धुमाळ
दीपाली धुमाळ यांनी संघटनेच्या माध्यमातून सर्व माजी विरोधी पक्षनेते एकत्रितपणे काम करणार असल्याचे सांगितले. “पक्षीय मतभेद बाजूला ठेवून पुणेकरांच्या समस्या आणि शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र काम करू,” असे त्या म्हणाल्या.
नव्याने स्थापन झालेल्या संघटनेचा केंद्रबिंदू पुणेकरांचे हित आणि पुणे शहराचा सर्वांगीण विकास असणार आहे. शहरातील रखडलेल्या प्रकल्पांचा पाठपुरावा, वाहतूक, पाणीपुरवठा, रस्ते, नागरी सुविधा आणि प्रशासनाच्या निर्णयांवर संघटनेच्या माध्यमातून नियमितपणे भूमिका मांडली जाणार आहे.

