सपकाळांची पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादीचा राडा

Date:

‘गुंगी गुडिया’ टिप्पणीचे सपकाळांकडून समर्थन; काँग्रेस कार्यालयात घुसून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवरून सुरू झालेला राजकीय वाद आणखी चिघळला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत या शब्दप्रयोगाचे ठामपणे समर्थन केले. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात प्रवेश करून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

“‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द नसून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मौनाचे वर्णन आहे. त्यांनी काँग्रेसच्या टीकेकडे सकारात्मकपणे पाहावे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींप्रमाणे आपल्या कर्तृत्वातून स्वतःला ‘दुर्गा’ सिद्ध करून दाखवावे,” असे आव्हान सपकाळ यांनी दिले.

धनंजय मुंडेंवर सपकाळांची टीका

बीडमधील व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत सपकाळ यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार टीका केली. पत्रकार आणि नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.

“धनंजय मुंडे पत्रकारांना शांत राहण्यास सांगत असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यामुळे काँग्रेसने वापरलेला ‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग योग्य आहे,” असा दावा सपकाळ यांनी केला.

धनंजय मुंडे यांची ओळख लोकप्रतिनिधीपेक्षा ‘गुंड’ म्हणून अधिक असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. हा आरोप सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केला असून त्यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

उपमुख्यमंत्र्यांच्या मौनावर प्रश्न

सुनेत्रा पवार महत्त्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगत असल्याचा आरोप करत सपकाळ म्हणाले, “अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत त्या बोलत नाहीत. त्यांना अद्याप अर्थखाते मिळालेले नसतानाही त्या गप्प आहेत. उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीचे असे मौन योग्य नाही.”

‘गुंगी गुडिया’ ही शिवी नसून त्यांच्या भूमिकेचे वर्णन असल्याचा पुनरुच्चार सपकाळ यांनी केला.

‘दुर्गा’ होण्याचे आव्हान

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा दाखला देत सपकाळ म्हणाले, “एका काळात इंदिरा गांधींनाही ‘गुंगी गुडिया’ म्हटले गेले होते. मात्र, त्यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध केले. सुनेत्रा पवार यांनीही धाडसी निर्णय घेऊन आपले नेतृत्व सिद्ध करावे.”

सुनेत्रा पवार यांनी अर्थखाते स्वतःकडे घ्यावे, अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी ठाम भूमिका घ्यावी, ‘लाडकी बहीण’ योजनेचे अनुदान १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करावे आणि शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशा मागण्या त्यांनी केल्या.

“हे निर्णय घेतल्यास काँग्रेसचा आरोप चुकीचा ठरेल आणि महाराष्ट्र त्यांना ‘दुर्गा’ म्हणून स्वीकारेल,” असे सपकाळ म्हणाले.

पत्रकार परिषदेत घोषणाबाजी

दरम्यान, सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात पोहोचले. सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीचा निषेध करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

कार्यकर्त्यांनी काँग्रेसने टिप्पणी मागे घेऊन सुनेत्रा पवार यांची माफी मागावी, अशी मागणी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पत्रकार परिषदेत गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी पर्यायी मार्गांचाही विचार करावा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अध्यासनाचे प्रमुख डॉ....

PMPMLची ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवा सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

मुळशी धरण, पळसे धबधबा आणि नयनरम्य सेल्फी पॉईंटचा प्रवास;...

सनी देओल म्हणाले- ‘भारत माझी आई तर पाकिस्तान मावशी आहे’:चित्रपट ‘बंटवारा 1947’ च्या प्रमोशनदरम्यान विधान

चित्रपट 'बंटवारा 1947' च्या प्रदर्शनापूर्वी सनी देओल एका वक्तव्यामुळे...