धायरीतील दोन पुलांना तातडीने एनओसी, मुळा-मुठा पुनरुज्जीवन मिशन आणि चारही धरणांतील गाळ काढण्यासाठी विशेष मोहिमेची मागणी
मुंबई / पुणे, दि. २ ऑगस्ट : पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन शहरासाठी अतिरिक्त २५ टीएमसी पाणीकोटा मंजूर करावा, अशी आग्रही मागणी महापौर मंजुषा नागपुरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.महापौर नागपुरे यांनी मुंबईत मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन पुणे शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या आणि दीर्घकालीन विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रलंबित प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी करणारे निवेदनही सादर केले.
बैठकीत पुण्याची वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाणी नियोजन, वाहतूक कोंडी, मुळा-मुठा नदीचे संवर्धन, पूर व्यवस्थापन आणि धरणांतील जलसाठा क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
पुणे शहराची भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन अतिरिक्त २५ टीएमसी पाणीकोटा मंजूर करावा, जेणेकरून पुढील अनेक दशकांसाठी पुणेकरांची पाण्याची गरज सुरक्षित करता येईल, अशी प्रमुख मागणी महापौरांनी केली.
धायरी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित दोन नवीन पुलांच्या बांधकामाला जलसंपदा विभागाने तातडीने ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. या पुलांमुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि अधिक सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
मुळा-मुठा नदीच्या सर्वांगीण संवर्धनासाठी राज्यस्तरीय ‘मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन मिशन’ स्थापन करावे, नदीतील गाळ काढणे, प्रदूषण नियंत्रण आणि पूर व्यवस्थापनासाठी एकात्मिक आराखडा राबवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. धरणांची मूळ जलसाठा क्षमता पुनर्संचयित करण्यासाठी जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिका यांची संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, अशी मागणीही महापौर नागपुरे यांनी केली.
जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व मागण्या सकारात्मकरीत्या ऐकून घेतल्या. संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती महापौर कार्यालयाकडून देण्यात आली.
महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “पुणेकरांना शाश्वत पाणीपुरवठा, कोंडीमुक्त रस्ते, सुरक्षित जलस्रोत आणि स्वच्छ मुळा-मुठा नदी मिळणे ही काळाची गरज आहे. शहराच्या विकासाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून तातडीने निर्णय होण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.”

