‘ऑपरेशन म्यूल हंट’चा पुण्यात धडाका; १३२ म्यूल खातेधारकांवर गुन्हे, १५२ आरोपी अटकेत

Date:

सायबर गुन्हेगारांचे आर्थिक जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पुणे पोलिसांची मोहीम; इतर राज्यांतील खातेधारकांना २,०९९ नोटिसा

पुणे, दि. ३१ जुलै : ऑनलाइन आर्थिक फसवणुकीत सायबर गुन्हेगारांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या ‘म्यूल खातेधारकां’विरोधात पुणे शहर पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन म्यूल हंट’ अभियानांतर्गत पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत आतापर्यंत १३२ म्यूल खातेधारकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, बँकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १५२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी तसेच ती विविध खात्यांमध्ये वळविण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडलेली, भाडेतत्त्वावर दिलेली किंवा मोबदल्याच्या बदल्यात वापरण्यास उपलब्ध करून दिलेली बँक खाती ‘म्यूल अकाउंट’ म्हणून वापरली जातात. या खात्यांच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार आर्थिक व्यवहारांची साखळी तयार करतात. त्यामुळे फसवणुकीच्या रकमेचा माग काढणे तपास यंत्रणांसाठी कठीण होते.

सायबर गुन्हेगारांचे हे आर्थिक जाळे उद्ध्वस्त करून ऑनलाइन फसवणुकीला आळा घालणे, हा ‘ऑपरेशन म्यूल हंट’चा प्रमुख उद्देश आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलीस आणि महाराष्ट्र सायबर यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

१,७०५ नोटिसांवर चौकशी सुरू

समन्वय पोर्टलच्या माध्यमातून इतर राज्यांकडून पुणे शहर पोलिसांना प्राप्त झालेल्या १,७०५ नोटिसांवर कारवाई सुरू करण्यात आली असून, संबंधित खातेधारक आणि व्यक्तींची चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे पुणे शहरातून इतर राज्यांतील म्यूल खातेधारकांना २,०९९ नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

या कारवाईचा विस्तार आता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपर्यंत करण्यात आला आहे. तपासादरम्यान पुणे, मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर तसेच अन्य राज्यांतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्रेही दाखल करण्यात आली आहेत.

आर्थिक व्यवहारांसह कॉल रेकॉर्डची तपासणी

म्यूल खातेधारकांचे आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड, डिजिटल व्यवहार, बँक खात्यांमधील पैशांची आवक-जावक तसेच सायबर गुन्हेगारांशी असलेल्या संपर्काचा सखोल तपास सायबर पोलीस करत आहेत.

फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी आपले बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींना सायबर गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीने स्वतः फसवणूक केली नसली, तरी गुन्हेगारांना खाते, एटीएम कार्ड, सिमकार्ड किंवा नेट बँकिंगची माहिती दिल्यास त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

खाते, एटीएम कार्ड किंवा ओटीपी देऊ नका

पुणे पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे बँक खाते अनोळखी व्यक्तीला वापरण्यास देऊ नये, असे आवाहन केले आहे. एटीएम कार्ड, चेकबुक, नेट बँकिंगची माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी कोणालाही सांगू नये.

तसेच सिमकार्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा अन्य वैयक्तिक कागदपत्रे मोबदल्याच्या बदल्यात कोणालाही देऊ नयेत. अशा माहितीचा सायबर गुन्ह्यात वापर झाल्यास संबंधित व्यक्तीवर सहआरोपी म्हणून कारवाई होऊ शकते.

तीन लाख नागरिकांपर्यंत जनजागृती

सन २०२६ मध्ये पुणे शहरात सायबर सुरक्षेबाबत १,१४२ जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून सुमारे तीन लाख नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्यात आला आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शाळा, महाविद्यालये, आयटी कंपन्या, गृहनिर्माण संस्था आणि सरकारी कार्यालयांमध्ये ‘कॅम्पस कनेक्ट – सेफ होरायझन’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांना सायबर सुरक्षा, आर्थिक फसवणूक, म्यूल खाती, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्त समाज या विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे.

संशयास्पद व्यवहारांची माहिती पोलिसांना द्या

सायबर गुन्हेगारांना मदत करणाऱ्या व्यक्तीची माहिती असल्यास ती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्यात द्यावी. अनोळखी व्यक्तीकडून बँक खाते वापरण्याची मागणी, कमी वेळेत जास्त कमिशनचे आमिष किंवा वैयक्तिक कागदपत्रांची मागणी झाल्यास सावध राहावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

“सजग नागरिक–सुरक्षित डिजिटल भारत” हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान थेऊर येथे संपन्न

सुमारे दीड हजार लाभार्थ्यांना लाभ पुणे, दि.३१: राज्य शासनाच्या महसूल...

विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय विनोदमूर्ती प्रकाश इनामदार...

हिंजवडीत अनधिकृत होर्डिंग्जवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा; लक्ष्मी चौकातील आठ फलक हटविले!

कारवाईच्या धास्तीने सहा फलक मालकांनी स्वतःहून काढले; उर्वरित दोन...

वीज पुरवठा आदी समस्या तातडीने सोडवाव्यात

आमदार शिरोळे यांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना पुणे : सोसायट्यांमध्ये भूमिगत...