लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपाचा मुंबईत भव्य पदयात्रेद्वारे एल्गार!

Date:

“जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत आम्ही ‘Regime Change’
होऊ देणार नाही”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ नोव्हेंबर २०२६ : लोकशाहीचे रक्षण, भारतीय संविधानाची प्रतिष्ठा आणि देशहिताच्या विरोधात काम करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, मुंबईच्या वतीने सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘लोकतंत्र बचाओ – अराजकता हटाओ’ या अभियानांतर्गत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
दादर पश्चिम येथील सेनापती बापट पुतळा येथून सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप प्रभादेवी येथील कामगार कल्याण मंडळ मैदान येथे झाला. या पदयात्रेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मा. रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री मा. अनुराग सिंह ठाकूर, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्यासह कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार, ॲड. मंगलप्रभात लोढा, श्री. नितेश राणे, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती श्री. सचिन अहिर, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आदी मान्यवर नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व मुंबईकर सहभागी झाले होते.
पदयात्रेपूर्वी दादर पश्चिम येथील सेनापती बापट पुतळा येथे भारतीय संविधानाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित करत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले.
यावेळी केंद्रीय मंत्री मा. रामदास आठवले यांनी आपल्या खास काव्यात्मक आणि मिश्किल शैलीत विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले की, “लोकशाहीमध्ये मोर्चे काढण्याचा आणि आंदोलन करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे; परंतु केवळ आंदोलन करून सरकार बदलता येत नाही. आमचा देश बांगलादेश नाही, आमच्या देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे. जोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान आहे, तोपर्यंत अशा आंदोलनांच्या जोरावर कोणालाही सरकार बदलता येणार नाही. तुम्हाला आम्हाला बदलायचे आहे, पण आम्हीच तुम्हाला २०१४ मध्ये बदललेले आहे!” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना आपल्या खास कवितेच्या शैलीत खोचक टोला लगावला.

यावेळी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात ‘Regime Change’ अर्थात केवळ सरकार बदलणे नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्था आणि घटनात्मक संस्थांमध्ये बदल घडवून आणण्याच्या कथित प्रयत्नांवर भाष्य केले. लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुकांच्या माध्यमातून सरकार बदलण्याचा अधिकार जनतेला आहे; मात्र ‘Regime Change’च्या नावाखाली संविधानाने निर्माण केलेली व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी भारतात अशा प्रकारची व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि त्यातून निर्माण झालेली लोकशाही व्यवस्था यांचे संरक्षण करण्यासाठी भाजपा आणि देशातील संविधानप्रेमी नागरिक कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या काळात आणीबाणी आणि घटनादुरुस्त्यांच्या माध्यमातून संविधानातील तरतुदींमध्ये बदल करण्यात आले होते. आज पुन्हा एकदा संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली. “ही लढाई भाजपची नाही, एनडीएची नाही; ही लढाई भारताच्या संविधानाची आहे,” असे सांगत संविधानाच्या रक्षणासाठी सर्व देशवासीयांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. “जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत आम्ही ‘Regime Change’ होऊ देणार नाही, संविधानाला हात लावू देणार नाही आणि लोकशाहीवर संकट येऊ देणार नाही,” असा ठाम निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘लोकतंत्र बचाओ – अराजकता हटाओ’ या अभियानाच्या माध्यमातून लोकशाही मूल्ये, संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रहितासाठी जनजागृती करण्याचा संकल्प भाजपा मुंबईच्या वतीने करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डिजिटल जीवन प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

जिल्हा कोषागार कार्यालयात केंद्र शासनाच्या अवर सचिवांची भेट; जीवन...

पाऊस पडूनही खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा घटला; पाच दिवसांत ०.६१ टीएमसी पाणी कमी!

चार धरणांत अवघा ८०.५२ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा ४.९३ टीएमसी...

पुण्याला वाढीव पाणीकोटा मंजूर करा; विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वाढती लोकसंख्या, नव्याने समाविष्ट गावे आणि औद्योगिक विस्ताराचा मुद्दा;...