- कारवाईच्या धास्तीने सहा फलक मालकांनी स्वतःहून काढले; उर्वरित दोन फलकांवर ‘पीएमआरडीए’ची धडक कारवाई
हिंजवडी / पुणे : नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या आणि परिसराचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकांवर (होर्डिंग्ज) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथील लक्ष्मी चौक परिसरात उभारण्यात आलेले तब्बल आठ अनधिकृत व महाकाय जाहिरात फलक या धडक कारवाईत जमीनदोस्त करण्यात आले आहेत. यात सहा फलक संबंधित फलकधारकांनी स्वतःहून हटविले, तर उर्वरित दोन फलकांवर प्रशासनाने धडक कारवाई केली.
हिंजवडीतील लक्ष्मी चौक परिसरातील गट क्रमांक २६२ आणि २६३ मध्ये अनधिकृत जाहिरात फलक उभारण्यात आल्याचे ‘पीएमआरडीए’च्या पाहणीत निदर्शनास आले होते. या ठिकाणी एकूण आठ महाकाय होर्डिंग्ज विनापरवाना उभारण्यात आले होते. प्रशासनाने कारवाईचा थेट इशारा दिल्यानंतर आणि सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन, कारवाईच्या धास्तीने संबंधित फलकधारकांनी स्वतःहून सहा होर्डिंग्ज तातडीने हटविले. मात्र, उर्वरित दोन अनधिकृत होर्डिंग्जवर अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने थेट कारवाई करून ते जमीनदोस्त केले. गुरुवार (दि. ३० जुलै) आणि शुक्रवार (दि. ३१ जुलै) अशा सलग दोन दिवसांत ही निष्कासनाची कारवाई पूर्ण करण्यात आली. या कारवाईदरम्यान एक महाकाय होर्डिंग काढताना पथकाची क्रेन कोसळण्याची दुर्घटना घडली; मात्र, सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
ही धडक मोहीम ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई पूर्ण केली. या पथकात तहसीलदार आशा होळकर, रवींद्र रांजणे तसेच दक्षता विभागाचे पोलीस निरीक्षक पवन पाटील यांच्यासह ‘पीएमआरडीए’चे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.
“शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज आणि जाहिरात फलकांविरोधातील ही निष्कासन मोहीम यापुढेही अत्यंत कठोरपणे राबविण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे यांनी दिला आहे.

