‘विकास कुणाचा? किंमत निसर्गाची!’ चर्चेत विकासाच्या संकल्पनेवर मूलभूत प्रश्न
पुणे, २ नोव्हेंबर २०२६
माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा पूर्ण झाला म्हणजे विकास झाला का? भौतिक सुखसोयी, मोठ्या इमारती आणि शहरांचा विस्तार म्हणजे विकास की प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता फुलण्यासाठी पोषक सामाजिक वातावरण निर्माण होणे, समाजात समानता, सुरक्षितता आणि आनंदाचे जीवन उपलब्ध होणे म्हणजे खरा विकास? अशा मूलभूत प्रश्नांवर संविधान जागर अभियानाच्या वतीने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता लोकायत हॉल येथे ‘विकास कुणाचा? किंमत निसर्गाची!’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती.
सध्या कर्जत येथील साईडोंगर परिसरातील ३००० मेगावॅट क्षमतेचा पंप स्टोरेज प्रकल्प आणि सोलापूरमधील उजनी धरण परिसरातील प्रस्तावित १.४ GW क्षमतेचा डेटा सेंटर प्रकल्प यांवरून समर्थन आणि विरोधाच्या भूमिका मांडल्या जात आहेत. मात्र, विकासाची व्याख्या काय, त्याचा फायदा कोणाला होणार आणि त्यासाठी निसर्गाची किती किंमत मोजावी लागणार, या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक आहे, असे अभियानाचे समन्वयक विशाल बागुल यांनी सांगितले.
शालेय शिक्षणात विज्ञान, गणित, इतिहास शिकवले जाते; मात्र जबाबदार नागरिक घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक आणि नागरिकशास्त्रीय जाणीवांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे व्यक्ती केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार करते, समाजाचा विचार मागे पडतो. भारताचा जागतिक आनंद निर्देशांकातील क्रमांक १४७ देशांमध्ये ११६ वा असणे हीदेखील विचार करण्यासारखी बाब आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारतीय संविधानाच्या कलम ४८-अ नुसार पर्यावरण संरक्षण ही शासनाची जबाबदारी आहे, तर कलम ५१-अ (ग) नुसार पर्यावरणाचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. या जाणीवेचा प्रसार करण्यासाठी चर्चेसोबतच जंगली महाराज रस्ता आणि एफ.सी. रोड परिसरात जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी दोन्ही प्रकल्पांची माहिती, पर्यावरणावरील संभाव्य परिणाम आणि नागरिकांची भूमिका स्पष्ट करणारी पत्रके वितरित करण्यात आली.
या उपक्रमाबाबत बोलताना अभियानाचे समन्वयक ऋषीकेश येवलेकर म्हणाले, “एखादा प्रकल्प आला की त्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात आंदोलने होतात. मात्र, विकास म्हणजे काय, त्याचा लाभ कोणाला मिळणार आणि त्याची किंमत कोण मोजणार, या प्रश्नांचा विचार होत नाही. नागरिकांनी कोणत्याही प्रकल्पाकडे केवळ समर्थन किंवा विरोध या दृष्टिकोनातून न पाहता त्याचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम समजून घेतले पाहिजेत. यासाठीच हे दोन्ही उपक्रम आयोजित करण्यात आले.”
माणसाचे आरोग्य, शिक्षण, रोजगार, समानता, आनंद आणि पर्यावरणाचा समतोल यांचा विचार केल्याशिवाय विकासाचे मूल्यमापन होऊ शकत नाही. निसर्गाचा विनाश करून नव्हे, तर माणूस, समाज आणि निसर्ग यांचे हित जपून होणारी प्रगती हाच खरा विकास, हा विचार या उपक्रमातून मांडण्यात आला.

