आमदार शिरोळे यांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना
पुणे : सोसायट्यांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे, झोपडपट्टी भागात एअर बंच केवल टाकणे आदी विद्युत विभागाची कामे तातडीने मार्गी लावावीत , अशा सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महावितरण अधिकाऱ्यां समवेत झालेल्या बैठकीत आज शुक्रवारी दिल्या.
छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील वीज समस्यांवर महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर आढावा आमदार शिरोळे यांनी घेतला. सेनापती बापट रोड येथील महावितरणच्या कार्यालयात ही बैठक झाली.
यावेळी झोपडपट्टी भागात एअर बंच केबल टाकणे, सोसायट्यांमध्ये टप्प्याटप्प्याने भूमिगत विद्युत वाहिन्या उभारणे, जंक्शन बॉक्स व पॅनलची दुरुस्ती, वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय, खडकी महावितरण कार्यालयात आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, नागरिकांना स्थानिक पातळीवर सर्व ग्राहक सेवा उपलब्ध करून देणे, वाढीव वीज बिलांची तपासणी आदी महत्त्वाच्या विषयांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः गणपती विसर्जन मार्गावरील विद्युत तारा सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राधान्याने भूमिगत करण्याची मागणी करत, याबाबत तातडीने नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नांवर वेळेत आणि परिणामकारक उपाययोजना व्हाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असेही शिरोळे यांनी सांगितले.
या बैठकीला महावितरणचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी तसेच श्री.अभय सावंत, श्री.कमलेश चासकर, श्री.शाम काची, श्री.योगेश कन्नूर, श्री.दुर्योधन भापकर, श्री.अजित पवार, लता धायगुडे, श्री.धर्मेश शहा, संगीता गवळी, श्री.फ्रान्सिस डेव्हिड, श्री.अमर देशपांडे, श्री. शांतीशेठ क्षत्रिय, श्री.धीरज गुप्ता, श्री.हेमंत शहा उपस्थित होते.

