सेवा कार्याप्रती समाजात संवेदनशीलता निर्माण व्हावी – सचिन भोसले.
पुणे- आद्य सरसंघचालक प. पू.डॉ. हेडगेवार म्हणायचे की “समाजाची सेवा हीच राष्ट्रसेवा आहे. समाजातील प्रत्येक घटक आपला आहे, या भावनेतून केलेले कार्य हेच खरे सेवाकार्य ” असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले यांनी सांगितले.
वस्ती विभागातील सेवाकार्य हा केवळ आकडेवारीचा किंवा लाभार्थी संख्येचा खेळ नसून सेवा आरोग्य फाउंडेशन ची दशकपूर्ती हा एक असा टप्पा आहे ज्याचा आदर्श सर्वांनीच घ्यावा.
” आरोग्य म्हणजे नेमके काय ” तर केवळ “आजार नसणे” म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे सुदृढ असणे म्हणजे आरोग्य आणि हेच अंगीकारून सेवा आरोग्य फाउंडेशन चे कार्य अविरत सुरू असून ह्या कार्यात आपले योगदान देणाऱ्यांचा सत्कार करताना मनस्वी आनंद होतं असल्याचे ही सचिन भोसले म्हणाले.सेवा कार्याप्रती समाजात संवेदनशीलता निर्माण व्हावी अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा कार्याचा एका भाग म्हणून सेवा आरोग्य फाउंडेशन ह्या संस्थेला रुग्णोपयोगी साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, संभाजी भागाचे रा. स्व. संघाचे कार्यवाह रवी लाटे, नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेविका रेशमा बराटे,सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र खेनट,सेवा आरोग्य फाउंडेशन चे संचालक मनोज देशमुख,डॉ. हर्षदा पाध्ये,कार्यालय प्रमुख बापू शिंदे, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर, समीर ताडे इ मान्यवर उपस्थित होते.
सचिन भोसले क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या ह्या उपक्रमाचे कौतुक करताना म्हणाले की सातत्याने विविध संस्थांना मदत करण्याच्या वृत्तीचा आदर्श इतरांनी ही घ्यावा आणि मदत करताना प्रत्यक्ष त्या कार्याशी जोडले जावे.
सेवा आरोग्य फाउंडेशन चे निस्वार्थ कार्य बघितल्यावर ह्या संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचा क्रिएटिव्ह फाउंडेशन ने निर्धार केला असून समाजातील अन्य दानशूरांनी देखील या कार्यात आपला वाटा उचलावा असे आवाहन क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले. पंचकोश च्या माध्यमातून विगत दहा वर्षे सेवा आरोग्य फाउंडेशन वस्ती विभागातील तळागाळातील माणसांना खऱ्या अर्थाने निरोगी बनविण्याची ध्यास घेऊन काम करत असल्याचेही खर्डेकर म्हणाले.
अन्नमय कोशच्या माध्यमातून वस्तीपातळीवर चालणारे ३१ साप्ताहिक दवाखाने, आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय शिबीरे, प्राणामय कोश च्या माध्यमातून फिजिओथेरपी दवाखाने,मनोमय कोश च्या माध्यमातून ” सांगाती ” आणि समुपदेशन उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या आणि महिलांच्या मनातील भीती, नैराश्य आणि ताणतणाव दूर करण्याचे उपक्रम, विज्ञानमय कोश च्या माध्यमातून समाजाचे बौद्धिक पोषण करण्यासाठी घे भरारी आणि समृद्धी वर्ग यासारखे प्रकल्प व आनंदमय कोशाच्या माध्यमातून आत्मिक समाधान आणि स्वावलंबन उपक्रम राबविले जातात, हे कार्य अत्यन्त स्पृहणीय असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
मंजुश्री खर्डेकर यांनी राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विकास पुरुषाची उपमा देतानाच त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने दैदीप्यमान प्रगती केल्याचा उल्लेख केला. तसेच राज्याच्या विकासासाठी झटणारे देवेंद्रजी हे शेतकऱ्यांसह इतर सर्वच विषयांप्रती संवेदनशील असून त्यांना दीर्घायुष्य लाभो अश्या शब्दात शुभेच्छा दिल्या.
सेवा आरोग्य फाउंडेशन चे संचालक मनोज देशमुख यांनी संस्थेची माहिती देताना ” कोथरूड, कर्वेनगर, वारजे व उत्तमनगर येथे 26 सेवा वस्त्यांमध्ये उपक्रम सुरू असून एकूण 21 साप्ताहिक दवाखान्यात एक लाख आठ हजार रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला असून 3 आयुर्वेदिक दवाखान्यात 9628,
5 फिजिओथेरपी रुग्णालयात 6900 एवढ्या रुग्णांनी लाभ घेतल्याचे सांगितले.संस्थेच्या नेत्र तपासणी शिबिराचा तसेच ओपीडी चा ही गरजुंना लाभ होतं असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगरसेवक राजाभाऊ बराटे व नगरसेविका रेश्माताई बराटे यांनी ही मनोगत व्यक्त करताना क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक करून आपण ही अश्या सेवाकार्यात सहभागी होऊ अशी ग्वाही दिली.
प्रतीक खर्डेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले व असे उपक्रम सतत राबविण्यात येतील असे जाहीर केले.






