पूरग्रस्तांना दरवर्षी दिलासा; कायमस्वरूपी उपाय मात्र कधी?
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांचे आयुक्त नवलकिशोर राम यांना खुले पत्र
पुणे | प्रतिनिधी
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर नदीकाठच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना दरवर्षी घडतात. या पार्श्वभूमीवर क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना खुले पत्र लिहून पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
खर्डेकर यांनी पत्रात म्हटले आहे की, प्रत्येक पावसाळ्यात पूर, बचावकार्य, तात्पुरते स्थलांतर आणि मदतकार्य याचीच पुनरावृत्ती होत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून मदतकार्य केले जात असले तरी पूरग्रस्तांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. हि व्यक्त करताना त्यांनी विंदा करंदीकर यांच्या काव्याच्या काही पंक्तीही सुनावल्या आहेत …
गोड गोड् जुन्या थापा,
तुम्ही पेरा, तुम्ही कापा;
जुन्या आशा, नवा चंग,
जुनी स्वप्ने,नवा भंग;
तुम्ही तरी करणार काय् ?
आम्ही तरी करणार काय् ?
त्याच् त्याच खड्ड्यामध्ये,
पुन्हा पुन्हा तोच् पाय;
जुना माल्, नवे शिक्के,
सब् घोडे बारा ट्क्के !
अशा काव्यात्मक शब्दांचा टोला लगावत खर्डेकर यांनी नदीकाठील पूरग्रस्तांचे पुनर्वसन, पूररेषेतील अतिक्रमणांवर कारवाई आणि नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कठोर कारवाई करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. शहरातील अनेक भागांत नाल्यांवर किंवा त्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणारी बांधकामे झाल्याने पावसाळ्यात पाणी साचणे, भिंती कोसळणे आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
आयुक्त नवलकिशोर राम यांना उद्देशून त्यांनी पुढील पावसाळ्यापूर्वी पूररेषेतील एकही घर शिल्लक राहणार नाही, यासाठी ठोस आणि दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा कारवाईत अडथळे आणणाऱ्यांची नावे जाहीर केल्यास पुणेकर प्रशासनाच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

