पुणे- ६५ वर्षांपूर्वी १२ जुलै १९६१ रोजी पुण्याजवळील पानशेत हे मातीचे धरण अती पावसामुळे फुटले आणि पुण्याचे अतोनात नुकसान झाले. वित्त व जीवित हानी झाली. या घटनेचे स्मरण म्हणून आज खडकवासला धरण येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी खडकवासला धरण येथे धरणातील पाण्याची पूजा करून साडी-चोळी, नारळाने ओटी भरली. आणि खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे सदैव सुरक्षित व पाण्याने सदैव भरलेली रहावित अशी प्रार्थना केली.
याप्रसंगी पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लहू अण्णा निवंगुणे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास मते, पुणे काँग्रेस खडकवासला विधानसभा अध्यक्ष सुरेश मते, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) खडकवासला विधानसभा अध्यक्ष संदिप मते, पुणे शहर काँग्रेस सरचिटणीस आबा जगताप, प्रदेश महिला सेक्रेटरी अर्चना शहा, पुणे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अवधूत मते, राजाभाऊ कदम, गुलाम हुसेन खान, मुरलीधर मते, विशाल पवार, विलास आबा मते, शांताराम मते, माजी सरपंच विजय कोल्हे, धनंजय पाटील, शांताराम मते, विजय लगड, अतुल कारले, नरसिंह आंदोली, अजय खुडे, तुळशीदास मते, प्रशांत नांदगुडे, महेश शिंदे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच याप्रंगी ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी पानशेत पूराच्या आठवणी जागवल्या.
१९६५ वर्षांपूर्वीच्या पानशेत प्रलयानंतर पुणेकरांची मोठी हानी झाली. पुणे त्यानंतर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात बदलले. त्या संकट काळात पुणेकरांनी मोठ्या धीराने या संकटाला तोंड दिले. अशी आपत्ती पुन्हा येऊ नये यासाठी धरणांची वेळोवेळी तपासणी करणे, धरणातील गाळ काढणे आणि पुण्याची जीवनवाहिनी असणारी मुठा नदी अधिक खोल करून सुरक्षित ठेवण्यावर भर दिला गेला पाहिजे असे दीप्ती चवधरी याप्रसंगी म्हणाल्या.
या प्रलयाची माहिती देताना दीप्ती चवधरी म्हणाल्या की, १२ जुलै, १९६१ रोजी, सह्याद्रीतील आंबी नदीवरील नव्याने बांधलेल्या मातीच्या धरणाची भिंत मुसळधार पावसामुळे कोसळून पानशेत धरण फुटले. या विनाशकारी पुराचे पाणी पुण्यात शिरले, ज्यात अनेकांचा बळी गेला, ६५,००० रहिवासी विस्थापित झाले आणि डेक्कन जिमखाना, नारायण पेठ, शनिवार पेठ, कसबा पेठ, सोमवार पेठ अशा नदी किनारच्या भागात शेकडो घरे उध्दवस्त झाली. यासारख्या परिसरांचे मोठे नुकसान झाले.
११ जुलै रोजी उशिरा धोक्याची जाणीव झाली असली तरी, भारतीय लष्कराने वाळूच्या पोत्यांनी रचना मजबूत करण्याच्या केलेल्या शौर्यपूर्ण प्रयत्नांमुळे काही मौल्यवान तास वाचले. याबद्दल भारतीय लष्कराचे पुणेकरांच्या वतीने दीप्ती चवधरी यांनी आभार मानले. धरणफुटी अखेरीस १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी झाली. मुठा नदीतून वेगाने वाहत आलेली पुराची प्रचंड लाट सकाळी १० वाजेपर्यंत पुण्यात पोहोचली, ज्यामुळे शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ यांसारख्या भागांमधील तळमजले आणि पहिले मजले २५ फुटांपर्यंत पाण्याखाली गेले. अशी आपत्ती पुणेकरांवर पुन्हा येऊ नये यासाठी हे जलपूजन करून ओटी भरण्यात आली असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आबासाहेब जगताप यांनी केले.

