आगरकर स्मृती पुरस्कराने शुभांगी देशपांडे तर डॉ. दाभोलकर कार्यकर्ता पुरस्काराने अनुराधा काळे यांचा गौरव
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : सध्या महाराष्ट्रात बुवाबाजीला ऊत आला असून प्रखर बुद्धीप्रामाण्यवादाची पदोपदी प्रतारणा केली जात आहे. समाजाची सद्सदविवेक बुद्धी दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. हे वैचारिक अध:पतन चिंताजनक आहे. देशाला प्रबोधनाचा प्रकाश दाखवणारा आगरकर-दाभोळकरांचा महाराष्ट्र सध्या अंधारात चाचपडतोय, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील संतांचे कार्य समाजापुढे आणताना त्यांनी मांडलेला अध्यात्मवाद आणि निवृत्तीवाद केवळ पुढे आणला गेला. मात्र प्रवृत्तीवाद, अंधश्रद्धेविषयी असलेले प्रखर विचार समाजापुढे आणले गेले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणेतर्फे आगरकर स्मृती पुरस्कराने शुभांगी देशपांडे तर डॉ. दाभोलकर कार्यकर्ता पुरस्काराने अनुराधा काळे यांना आज (दि.१२) गौरविण्यात आले. पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गिताली वि. म. आणि प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रा. जोशी अध्यक्षपदावरून बोलत होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य श्रीपाल ललवाणी, पुणे शहर कार्याध्यक्ष दत्तात्रय जाधव मंचावर होते. सन्मानचिन्ह आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, एखादी परंपरा स्थलकालाच्या विशिष्ट संदर्भात उपयुक्त ठरली म्हणून ती सदासर्वकाळ उपयुक्त ठरेलच असे नाही. तिची कालसापेक्षता आणि कालबाह्यता ओळखून ती नाकारण्याचे धैर्य समाजाने दाखविले पाहिजे. निरुपयोगी परंपरांनी जखडलेल्या समाजाचा सर्वांगीण विकास कधीच होणार नाही. श्रद्धेला जोपर्यंत विवेकनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठेचे अस्तर असते तोपर्यंत श्रद्धा माणसाच्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या ऊर्जेचे काम करते. पण विवेकशून्य श्रद्धा माणसाचे जीवन कडेलोटाच्या काठावर आणून उभे करते. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण व्यवस्थेने विज्ञानाचे पदवीधर मोठ्या संख्येने निर्माण केले; पण विज्ञाननिष्ठा रुजविण्यात शिक्षण व्यवस्था कुचकामी ठरली आहे. आमची तीर्थस्थाने श्रीमंतांच्या पापक्षालनाची स्थळे बनू नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गिताली वि. म. म्हणाल्या, आजची सामाजिक परिस्थिती अतिशय विदारक असली तरी सकारात्मक राहून कार्य होणे गरजेचे आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद बोकाळलेल्या समाजात स्त्री आजही दुर्लक्षित आहे. व्यवस्थेचा मोठा डोंगर स्त्रीपुढे आ वासून उभा आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सांस्कृतिक राजकारण करत राजकारणाविषयी सक्रिय आणि सजग होणे आवश्यक आहे. अध:श्रद्धा निर्मूलन करतानाही स्त्री-पुरुष समानता सांभाळणे आवश्यक असून आज फक्त समाजप्रबोधन करून उपयोग नाही तर आर्थिक, सामाजिक परिस्थिती बदलत मानसिक धर्म, संस्कार, श्रद्धा पुसून टाकत सांस्कृतिक पर्याय देणे अत्यंत गरजेचे आहे.
पुरस्काराला उत्तर देताना अनुराधा काळे, शुभांगी देशपांडे यांनी आपल्या कार्याची ओळख करून दिली. प्रास्ताविकात श्रीपाल ललवाणी यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. मान्यवरांचा सत्कार दीपक गिरमे, अरविंद पाखले यांच्या हस्ते करण्यात आला तर मान्यवर व पुरस्कारार्थींचा परिचय वसंत कदम, अनिल वेल्हाळ यांनी करून दिला. सूत्रसंचालन दत्तात्रय जाधव यांनी केले.

