पुणे, दि. ११ जुलै : आषाढी वारी पालखी सोहळा २०२६ निमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यनगरीतून सासवडकडे प्रस्थान होत असताना हडपसर येथे शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने भव्य वारकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना राष्ट्रीय सचिव शायना एनसी व श्रीमती श्रेया योगेश कदम यांनी हजारो वारकरी बंधू-भगिनींसमवेत पायी चालत आत्मीय संवाद साधला. टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. विविध दिंड्यांमधून सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तसेच साड्या, ब्लँकेट, पिण्याचे शुद्ध पाणी आणि अन्य आवश्यक वस्तूंचे वितरण करून वारकरी संप्रदायाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या सन्मान सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
यावेळी शिवसेना राष्ट्रीय सचिव शायना एनसी व श्रेया योगेश कदम यांनी वारकरी बंधू-भगिनींशी पायी चालत संवाद साधत त्यांच्या वारीतील अनुभव, प्रवासातील अडचणी, आरोग्य, निवास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विविध आवश्यक सुविधांची माहिती जाणून घेतली. विशेषतः महिला वारकरी भगिनींशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या सुरक्षिततेसह आवश्यक सोयी-सुविधांबाबत विचारपूस करण्यात आली. या आत्मीय संवादामुळे वारकरी बंधू-भगिनींनी समाधान व्यक्त करत शिवसेनेच्या सेवाभावी उपक्रमांचे कौतुक केले. वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य देत त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती देण्यात आली. महाराष्ट्राची संतपरंपरा, वारीची अखंड परंपरा आणि वारकरी संप्रदायाने जपलेली भक्ती, समता, बंधुता व सामाजिक ऐक्याची मूल्ये अधिक दृढ करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सेवाभावाने कार्य केले पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. हरिनामाच्या अखंड गजरात, भक्तिमय वातावरणात आणि वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडलेल्या या सोहळ्याने हडपसर नगरी पुन्हा एकदा विठ्ठलभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली.
यावेळी शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, उपशहर प्रमुख दत्ता खवळे, जिल्हा उपसंघटक पंकज कोद्रे, सागर राजे भोसले, सुदर्शना त्रिगुणाईत, धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे राज्य प्रमुख अक्षय महाराज भोसले यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सक्रिय सहभागातून वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असल्याचेही त्या म्हणाल्या.

