पुणे | प्रतिनिधी
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत रविवारी (५ जुलै) सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६४६ एमसीएफटी पाण्याची आवक झाली. त्यामुळे चारही धरणांतील एकूण पाणीसाठा ५.७२ टीएमसी (१९.६३ टक्के) इतका झाला आहे.
मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १७.६७ टीएमसी (६०.६२ टक्के) पाणीसाठा होता. त्यामानाने यंदा अद्यापही पाणीसाठा लक्षणीयरीत्या कमी असल्याचे चित्र कायम आहे.
धरणनिहाय पाहता, पानशेत धरणात सर्वाधिक २०२ एमसीएफटी, वरसगावमध्ये २८० एमसीएफटी, टेमघरमध्ये १३७ एमसीएफटी आणि खडकवासला धरणात २७ एमसीएफटी पाण्याची आवक झाली.
सध्या धरणांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे:
खडकवासला – ०.३१ टीएमसी (१५.४७%)
पानशेत – २.६५ टीएमसी (२४.८८%)
वरसगाव – २.५४ टीएमसी (१९.८५%)
टेमघर – ०.२२ टीएमसी (६.०१%)
दरम्यान, खडकवासला धरणाच्या सांडव्यातून अद्याप पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. तसेच धरणांमधून वीज निर्मिती किंवा अन्य जलविसर्गही सध्या बंद आहे.

