पुणे | प्रतिनिधी
खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ५५ वर्षीय इसमाला विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाने जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २७ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सेवन लव्हज चौक परिसरात घडली.
फिर्यादी दुचाकीवरून जात असताना अल्पवयीन मुलाने त्यांच्या जवळ येऊन खिशातील एक हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
🔹 बसमध्ये चढताना १.६४ लाखांचे दागिने चोरी
हडपसर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ४६ वर्षीय महिलेच्या पर्समधील रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६४ हजार ९९० रुपयांचा ऐवज लंपास केला. हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
🔹 डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भरधाव डंपरने ६० वर्षीय पादचारी महिलेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔹 वृद्ध दाम्पत्याच्या घरातून २.७० लाखांचे दागिने चोरी
चंदननगर परिसरात वृद्ध दाम्पत्याची देखभाल करणाऱ्या महिलेने घरातील सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔹 शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ४.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक
शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी ४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.

