सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ

Date:

विद्यार्थ्यांनी भारतीय मूल्ये, नैतिकता आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश जगभरात पोहोचवावा– राज्यपाल जिष्णू देव वर्मा

पुणे, दि. २७ : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करावे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश, भारताची संस्कृती आणि मूल्ये आपल्या देशात पोहोचवावीत, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

लवळे येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीदान समारंभ-२०२६ मध्ये ते बोलत होते. यावेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष,अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्रा.डॉ.एस. बी. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रामन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबई येथील फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हेरिनो, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष हेन्री तेबांडेके आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, आज जग परिवर्तनाच्या उंबरठ्यावर असून कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडवून आणत आहे. अशा काळात युवकांनी ‘तुम्ही काय करता’ यापेक्षा ‘ते कसे करता’ याला अधिक महत्त्व द्यावे. त्यासोबतच प्रत्येक कृतीमध्ये नैतिकता, करुणा आणि प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे.

नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय किंवा प्रशासकीय पद नव्हे, तर प्रत्येक व्यक्ती आपल्या आचरणातून नेतृत्व करू शकते. योग्य कृती आणि उच्च मूल्ये समाजाला अधिक सक्षम बनवतात. भारतीय संस्कृतीतील ‘धर्म’ म्हणजे मनाला उन्नत करणारी मूल्ये जपणे होय, असेही त्यांनी सांगितले.

राज्यपाल पुढे म्हणाले, महान संस्था या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वांमुळे उभ्या राहतात. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. एस. बी. मुजुमदार यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उदात्त तत्त्वज्ञानावर आधारित संस्था उभारून जगभरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. ही संस्था केवळ शिक्षण देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनाची आणि व्यक्तिमत्त्वाचीही जडणघडण करते.

सिम्बायोसिसमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अधिक मोठी सामाजिक जबाबदारी आहे. पदवी घेऊन मायदेशी परतताना त्यांनी भारताची संस्कृती, येथील मानवी मूल्ये, मैत्री आणि पुण्याच्या समृद्ध परंपरेच्या आठवणी सोबत घेऊन जाव्यात, अशी अपेक्षाही राज्यपाल महोदयांनी व्यक्त केली.

फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हेरिनो यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना भारत-फ्रान्स मैत्री, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला. भारत आणि फ्रान्समधील दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होत असून २०२६ हे ‘भारत-फ्रान्स नवोपक्रम वर्ष’ म्हणून साजरे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी केवळ पदवीच नव्हे तर जागतिक दृष्टीकोन, विविध संस्कृतींचा आदर आणि मानवतेची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. फ्रान्समधील उच्च शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी, जागतिक दर्जाची विद्यापीठे तसेच ८०० हून अधिक फ्रेंच कंपन्यांमुळे रोजगाराच्या उपलब्ध संधींची माहिती त्यांनी दिली.

डॉ. मुजुमदार म्हणाले, भारतातील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर भारतीय संस्कृती, विविधता, लोकशाही आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मूल्यांचा अनुभव मिळतो. परदेशात शिक्षण घेतल्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, हे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदाहरणांद्वारे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज आणि देशाच्या विकासासाठी करावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

प्र कुलपती डॉ. येरवडेकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक प्रगती सोबत सिम्बायोसिस संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

३.६५ लाखांचा गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची कारवाई; चंदननगर पोलिस ठाण्यात...

भाजपने पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केल्याने पुण्यावर आपत्ती – चंदूशेठ कदम

पुणे-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेच्या हव्यासापायी राजकारणाला अति महत्व...

जीवे मारण्याची धमकी देत १० लाखांची खंडणी मागणारी टोळी जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; चार आरोपी अटकेत, ७.०९ लाखांचा...

आंबेगावमध्ये पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात गेल्या २४ तासांत विविध प्रकारचे...