८४ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा; पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने स्पर्धा
पुणे : कुमार गटात जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित हरियानाची अनुपमा उपाध्याय आणि छत्तीसगडची आकर्षी कश्यप यांच्यात राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम लढत होणार आहे.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावाला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने योनेक्स सनराईज ८४ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू आहे.
आकर्षीने आदिता रावचे आव्हान २१-९, २१-१९ असे संपुष्टात आणले. अनुपमाने अस्मिता चलिहाचा प्रतिकार २१-१८, ११-२१, २१-१८ असा संपुष्टात आणला. पुरुष एकेरीत महाराष्ट्राच्या हर्षिल दाणीचे आव्हान संपुष्टात आले. हर्षिल दाणीला मध्य प्रदेशच्या प्रियांशु राजावतकडून १४-२१, १५-२१ अशा पराभवाचा सामना करावा लागला.
अनुपमा आणि अस्मिता यांच्यातील खेळात संयम निर्णायक ठरला. अनुपमाने अगदी नियंत्रित सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये २-२, ६-६, ९-९, १०-१० अशा बरोबरीतील स्थितीनंतर १५-१३, १६-१५ अशी आघाडी कायम राखली. त्या वेळी सलग चार गुणांची कमाई करताना अनुपमाने २०-१६ अशी गुणांची कमाई करताना पहिली गेम निसटणार नाही याची काळजी घेतली. दुसऱ्या गेमला अस्मिताने आपला खेळ कमालीचा उंचावला आणि १-१ नंतर सलग आठ गुण घेत ८-१ अशी आक्रमक सुरुवात केली. यानंतर अनुपमा दुसऱ्या गेमला अस्मिताला गाठूच शकली नाही. गेमच्या मध्याला अस्मिता ११-६ अशी आघाडीवर होती. ही मोठी आघाडी अशीच कायम राखताना अस्मिताने नंतर अनुपमाला केवळ पाचच गुण मिळू दिले.
निर्णायक गेम मात्र कमालीचा चुरशीचा झाला. अस्मिताने ५-१ अशी झकास सुरुवात केली होती. अस्मिताचे फटके आणि स्मॅशेस अचूक बसत होते. अनेकदा तिने अनुपमाला पुढेही खेचले. पण, अस्मिताला या वर्चस्वाचा फायदा उठवता आला नाही. आक्रमक खेळण्याच्या नादात अस्मिताचे फटक्यांच्या वेगावरील नियंत्रण सुटले आणि अनेकदा शटल नेटमध्ये अडकले. वेगवान फटके मारताना अस्मिताचे फटके बाहेर गेले. या निरर्थक चुकांचा अस्मिताला फटका बसला. अनुपमाने संयमाने खेळ करताना समोर येईल त्या संधीचा फायदा उठवत २०-१७ अशी आघाडी घेतली. त्या वेळी अस्मिताने एक मॅच पॉइंट वाचवला खरा. पण, तिची झुंज तेवढ्यापुरतीच ठरली. पुन्हा एकदा तिचा फटका नेटमध्ये अडकला आणि अनुपमाच्या अंतिम फेरीवर शिक्कामोर्तब झाले.
त्यापूर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत आकर्षीला तिसऱ्या मानांकित आदिता रावचा प्रतिकार परतवण्यात फारसे प्रयास पडले नाही. कमालीच्या आत्मविश्वासाने खेळताना अस्मिताने ३८ मिनिटांत आदिताचे आव्हान संपुष्टात आणले.
निकाल (सर्व उपांत्यफेरी)
महिला एकेरी – आकर्षी कश्यप वि.वि. आदिती राव २१-९, २१-१९, अनुपमा उपाध्याय वि.वि. अस्मिता चलिहा २१-१८, ११-२१, २१-१८
मिश्र दुहेरी – सिद्धार्थ एलान्गो-खुशी गुप्ता वि.वि. मनु अत्री – के मनिषा २२-२०, २१-१३, हेमनागेंद्र बाबू टी-कनिका कन्वल वि.वि एम. अर्जुनकुमार रेड्डी-डी पूजा २१-१८, २१-१६
पुरुष दुहेरी – कुशल राज-प्रकाश राज वि.वि. हरिहरन अम्साकरुणन-रुबन कुमार आर. १६-२१, २१-१९, २१-१९