पुणे- कसबा पोट निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या काही प्रसंग घटनांच्या वरून दोन्ही उमेदवार म्हणजे धंगेकर आणि रासने यांच्यासह राष्ट्रवादी च्या रुपाली पाटलांवरही गुन्हा दाखल झाला आहे ,गुन्हा घडत असताना अगदी वर पासून खालपर्यंत चे निवडणूक अधिकारी कोणते कर्तव्य बजावत होते ? कोणास साथ देत होते याची कोणतीही चौकशी अगर काहीही करण्याचा इरादा मात्र दिसून आलेला नाही . या तिघांवर गुन्हे दाखल करून प्रशासन मात्र अगदी स्वच्छ, सभ्य ,कायद्याचे पालन करणारे असल्याचा तोरा आता मिरविणार आहे. आणि या तिघांवरही दाखल झालेल्या गुन्ह्यांचे पुढे काय होणार आहे ? या प्रश्नाचे उत्तर हि जनतेला ठाऊकच असावे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकांसाठी काल मतदान पार पडलं. मतदानाचा दिवस भाजप आणि महाविकास आघाडीच्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. तर आज मतदानाच्या दुसऱ्या दिवशीही राजकीय घडामोडींना वेग आला आहे.भाजपचे कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदानाला जाताना गळ्यात भाजपचं उपरणं घातलं होतं. कमळाचं चिन्ह असलेलं हे उपरणं घालूनच त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला आणि मतदान करून बाहेर पडले. या प्रकरणी रासने यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करत उपोषण केलं होतं. भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. पत्नीसह त्यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. हा आचारसंहितेचा भंग असल्याच्या कारणामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. तर रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.