मुंबई – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या उर्जा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण मोबिलिटी सुविधा कंपनीने एथर एनर्जी या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँडसह धोरणात्मक भागिदारी जाहीर केली आहे. भारतात सर्वात मोठे ईव्ही चार्जिंग नेटवर्क विस्तारण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या भागिदारीमुळे एथर एनर्जीला बीपीसीएलची देशभरात पसरलेली २१,००० पेक्षा जास्त फ्युएल स्टेशन्स उपलब्ध होतील व तिथे एथरचे फास्ट- चार्जिंग ग्रिड बसवता येतील.
देशात दमदार आणि सर्वत्र चार्जिंग पायाभूत सुविधांचे नेटवर्क प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट एथर एनर्जीने ठेवले असून त्यांनी १०० शहरांत १४०० चार्जर्ससह भारतात सर्वात मोठे ईव्ही चार्जिंग नेटवर्क उभे केले आहे. बीपीसीएलसह भागिदारी करून एथर ग्रिडचा विस्तार करण्याचे ध्येय एथर एनर्जीने ठेवले आहे व त्याद्वारे एथर इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या देशभरातील पसरलेल्या ग्राहकांना सेवा देणे शक्य होईल. ग्राहकांना एथर अपवरून ही फास्ट चार्जर्स सहजपणे शोधून चार्जर उपलब्ध असल्याची माहिती पाहिजे तेव्हा आणि तत्काळ मिळवून त्यानुसार चार्जिंगचे नियोजन करता येईल.
या भागिदारीमुळे एथर एनर्जीचे मोठ्या शहरांतील नेटवर्क बळकट होईल तसेच जास्त वापर असलेल्या आंतरशहरी मार्गांवर चार्जिंगच्या सुविधा तयार करता येतील. सुरुवातीच्या टप्प्यात एथर एनर्जीने दिल्ली एनसीआरमधील चार ठिकाणी चार फास्ट चार्जर्स यशस्वीपणे बसवले आहेत. कंपनीने यावर्षाच्या अखेरीपर्यंत भारतातील बीपीसीएलच्या विविध ठिकाणी फास्ट चार्जर्सची संख्या १०० पर्यंत नेण्याचे ठरवले आहे.
देशात हरित उर्जेला चालना देण्यात बीपीसीएल आघाडीवर आहे. भारतात ७००० एनर्जी स्टेशन्सचे नेटवर्क तयार करत ईव्हीला मध्यवर्ती स्थान मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे. भारतात वैयक्तिक वापरासाठी दुचाकीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्येही दुचाकीला आधी पसंती देण्यात आली. एथर एनर्जीसारख्या इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आणि नाविन्यपूर्णतेवर भर देणाऱ्या कंपनीशी भागिदारी ही आमच्या एनर्जी स्टेशन्सवर ग्राहकांना सर्वोत्तम ईव्ही चार्जिंग सुविधा मिळवून देण्याच्या दिशेने उचललेले धोरणात्मक पाऊल आहे. यामुळे ईव्ही क्षेत्रात नाविन्यपूर्ण सुविधा सहजपणे उपलब्ध होतील.
एथर एनर्जीचे प्रमुख व्यवसाय अधिकारी रवनीत फोकेला म्हणाले, ‘देशात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यासाठी दमदार चार्जिंग पायाभूत सुविधांचे नेटवर्क तयार करणे आवश्यक आहे. म्हणूनच एथर एनर्जीने भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक व्हिइकल चार्जिंग नेटवर्क उभारण्यासाठी गुंतवणूक केली. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसह (बीपीसीएल) भागिदारी केल्याने देशभरात चार्जिंग नेटवर्क उभारण्याच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळेल. या भागिदारीमुळे बीपीसीएलच्या फ्युएल स्टेशन्सचे मोठे नेटवर्क आमच्यासाठी उपलब्ध होईल आणि ग्राहकांना फास्ट- चार्जिंग ग्रिड सोयीस्कर अंतरावर उपलब्ध होतील. ईव्हीचा वापर वाढेल तसा चार्जिंग सुविधा सहजपणे उपलब्ध करण्यासाठी अशाप्रकारच्या धोरणात्मक भागिदारी महत्त्वाच्या ठरतील.’
या भागिदारीविषयी बीपीसीएलच्या रिटेल नॉर्थचे प्रमुख राजीव दत्ता म्हणाले, ‘२०४० पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी बीपीसीएल सातत्याने प्रयत्नशील आहे. आम्ही आमच्या ७००० पारंपरिक रिटेल दालनांचे एनर्जी स्टेशन्समध्ये रूपांतर करण्याच्या दिशेने आणखी जवळ जात आहोत. हा आमच्या शाश्वत उपक्रमांना प्राधान्य व पाठिंबा देण्याच्या सर्वसमावेशक डिकार्बनायझिंग धोरणाचा भाग आहे. ईव्ही वापरामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आघाडीवर आहेत आणि रिटेल दालनांमध्ये चार्जिंग पायाभूत सुविधा उपलब्ध करत ईव्हीचा वापर करू इच्छिणाऱ्यांना आत्मविश्वास व सोयीस्करपणा मिळवून देण्याचे आम्ही ठरवले आहे.’
एथर एनर्जी आणि बीपीसीएल यांच्यात करण्यात आलेली ही भागिदारी देशातील ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा क्षेत्रातील महत्त्वाची घटना आहे. दिल्ली एनसीआरपासून सुरुवात करत आम्ही नेटवर्क विस्तारण्यावर भर देत आहोत. लवकरच या सुविधा देशभरात उपलब्ध केल्या जाणार आहेत. आपल्या ग्राहकांना सोयीस्कर आणि सहजपणे चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एथर एनर्जी बांधील आहे.
पेट्रोल बंक्सचे इलेक्ट्रिकीकरण करण्यासाठी बीपीसीएल झटत असून हरित उर्जा उपायांचा अवलंब करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी व भारतात शाश्वत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी योगदान देण्यासाठी कंपनी उत्सुक आहे.