पुणे : आज भारतात अनेक अडचणी आहेत. भारतात काय राहिले आहे असा विचार केला तर भारतात चांगले शिक्षक आहेत. खूप काही चांगलं घडविण्याची ताकद आहे. विद्यार्थ्यांच्या ऊर्जेचे चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर करण्याचे काम शिक्षक करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले तरी शिक्षकांचे महत्त्व कमी होणार नाही. शिकवताना शिक्षकांची जी भावना असते ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही, त्यामुळे शिक्षकाला पर्याय नाही. शिक्षणाचे वृत्तीमध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे. असे मत माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राच्या वतीने शिक्षक पुरस्कार आणि विद्यार्थी आर्थिक सहाय्य कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार पेठेतील वरदश्री सभागृहात करण्यात आले होते. यावेळी केंद्रप्रमुख मकरंद माणकीकर, कार्यवाह विश्वनाथ भालेराव, मध्यवर्ती सदस्य अनिल शिदोरे, संयोगिता पागे, शैक्षणिक प्रमुख राजेंद्र देवधर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात संस्कृत शिक्षिका भाग्यश्री हर्षे, मराठी विषय शिक्षक यशवंत हरिभक्त, योग शिक्षिका लीना भुस्कुटे, विज्ञान शिक्षक हेमंत पाठक यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. संस्कृत आणि मराठी विषयात पीएचडी आणि पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आजच्या काळात समाजातील सर्व लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे समाजामध्ये फूट पाडण्याचे काम आधी इंग्रजांनी केले आता समाजातीलच काही लोक करत आहेत. देशावर भक्ती करायला शिक्षकांनी शिकवले पाहिजे.
आपली संस्कृती सोडून दुसऱ्यांच्या संस्कृतीचे अनुकरण करू नका. आपल्यावरची श्रद्धा हरवते तेव्हा दुसऱ्याचे आकर्षण वाटते आणि आपल्या गोष्टींचे विस्मरण होते. शेक्सपिअर वाचा पण कालिदास देखील वाचायलाच हवे, असेही त्यांनी सांगितले.
विश्वनाथ भालेराव यांनी स्वागत, मकरंद माणकीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुजाता मवाळ यांनी आभार मानले.