पळून गेलेल्या ४० आमदारांना गुवाहाटीत आश्रय देणाऱ्या आसामला भीमाशंकर दिला का? काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका :
मुंबई–देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे प्रसिद्ध श्री महादेव मंदिर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेले आहे. शिवपुराण, शिवलीलामृतात त्याचे पुरावेही आहेत. मात्र आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी हे “भीमाशंकर ज्योतिर्लिंग’ त्यांच्या राज्यात असल्याचा दावा केला आहे.महाशिवरात्रीचा सण १८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर आसामच्या पर्यटन विभागाने तेथील डाकिनी टेकडी, कामरूप या ठिकाणी हे देवस्थान असल्याच्या जाहिरातही सर्वत्र प्रकाशित करून भाविकांना या मंदिराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता ज्योतिर्लिंगांबाबत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका : पळून गेलेल्या ४० आमदारांना गुवाहाटीत आश्रय देणाऱ्या आसामला भीमाशंकर दिला का?
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. ‘उद्योगच नव्हे तर आता भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. शिंदे-फडणवीस सरकारने तत्काळ याबाबत भूमिका स्पष्ट करावी.’ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आद्य शंकराचार्य यांच्या बृहद रत्नाकर स्रोतामध्ये ‘भीमा नदीचा उगम व डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर’ म्हटले आहे. अजून कोणता पुरावा हवा? घटनाबाह्य ईडी सरकार गुवाहाटीला ४० आमदारांची फाैज घेऊन गेले हाेते. तिथे तुमची साेय आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली हाेती. त्याबदल्यात तुम्ही भीमाशंकर त्यांना देऊन आला तर नाही ना?’
परळी येथील पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिरावरही झारखंडचा दावा
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, भगवान शंकर महादेव ज्या ठिकाणी स्वत: प्रकट झाले ती १२ ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू या राज्यांमध्येही ही १२ मंदिरे आहेत. पैकी महाराष्ट्रात परळी वैजनाथ, भीमाशंकर, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर व वेरूळ ही पाच मंदिरे आहेत. बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर हे पाचवे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र त्याबाबतही उत्तरेतील राज्यांकडून संभ्रम निर्माण करण्यात येत आहेत. झारखंड येथील देवघर येथे खरे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असल्याचा दावा तेथील काही धर्म अभ्यासकांंनी केला. हिमाचल प्रदेशात बैजनाथ येथे पाचवे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला जातो. परंतु संकेश्वरपीठाधीश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी परळी येथील शिव मंदिर हेच ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केलेला आहे. आसामच्या पर्यटन विभागाने दिलेल्या जाहिरातीतही पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून परळीचा मंदिराचा उल्लेख केलेला नाही.