पुणे-पाश्चात्य देशांमध्ये एका कुटुंबात सरासरी 2.5 व्यक्ती असतात, तर भारतात 4.5 व्यक्ती असतात. याचा अर्थ आपल्याकडे तीन पिढ्या एकत्र नांदत असल्याने ज्येष्ठांची काळजी घेतली जाते, नातवंडांवर संस्कार होतात. या कुटुंब पद्धतीमुळे आपल्या देशात सामाजिक सुरक्षा असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
सामान्य परिस्थितीतून बालविवाह, पुनर्विवाह असा संघर्ष करीत यशस्वी व्यवसाय करणाऱ्या आणि गरजवंतांसाठी मायेची सावली असणाऱ्या माई कुलकर्णी यांच्या जीवनातील संजय कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेल्या महत्त्वाच्या लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कुटुंब प्रबोधन संयोजक रविंद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जावडेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
जावडेकर म्हणाले, ”भारतीय कुटुंब व्यवस्थेत कुटुंबाचे व्यवसाय, आचार, विचार, परंपरा यांना महत्त्व आहे. अन्य देशांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असणारी कुटुंब व्यवस्था ही आपली ताकद आहे. ‘माई’ या भारतीय कुटुंब व्यवस्थेचे प्रतिक आहेत.”
जोशी म्हणाले, ”आईजवळ व्यवस्थापन शिकता येते, परंतु आजच्या मुलीला आई व्हायचे नाही. हा विरोधाभास संपवून कुटुंब व्यवस्थेचा वसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाच्या मनात ‘माई’ असणे आवश्यक आहे.”
रमा कुलकर्णी यांनी स्वागत व सूत्रसंचालन, संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक आणि ऋता कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.