एम.आय.टी. पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळेत बालजत्रा संपन्न
पुणे- माईर्स,एम.आय.टी. पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य बालजत्रेचे आयोजन करण्यात आले होते. विविध गमतीदार खेळ, जंपिंग जॅक, टॅटू काढणे, आकर्षक छोटा भीम व डोरेमॉन हे या जत्रेचे प्रमुख आकर्षण होते. यावेळी पालक व विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ठ वेशभूषा ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना प्रमुख पाहुणे डॉ. सौ. जयश्री फडणवीस प्रिन्सिपल डायरेक्टर, डिझायनर लर्निंग सिस्टिम, द फिनिशिंग स्कूल, मृणालिनी भिडे, पर्यवेक्षिका, माईर्स, एम.आय.टी. प्रशाला, पुणे, व सौ. संगीता देशपांडे, पर्यवेक्षिका, माईर्स एम.आय.टी. पूर्व प्राथमिक मराठी माध्यम शाळा यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शाळेचे सर्व विद्यार्थी व पालक या जत्रेत सहभागी झाले होते. पर्यवेक्षिका, शिक्षिका, इतर सेवकवर्ग आणि पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
माईर्स, एम.आय.टी. पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम ही पुण्यातील नामांकित शाळा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. पंचवीस वर्षांपूर्वी लावलेल्या रोपाचे विशाल वृक्षात रुपांतर झाले आहे. प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्यकारी अध्यक्ष व संस्थापक, माईर, पुणे, अध्यक्ष, विश्वशांती केंद्र, आळंदी, पुणे. तसेच प्रा. प्रकाश जोशी , सहव्यवस्थापकीय विश्वस्त, अध्यक्ष, शाळा समिती, माईर्स एम्. आय्. टी. प्रशाला, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.
मुलांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्व, धीटपणा या गुणांची जोपासना होण्यासाठी विविध स्पर्धा, खेळ व संगीत दिवस, सहली, पारंपारिक पद्धतीने सण साजरे करणे याचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना कॅम्लीन, आंतरशालेय नाटक-नृत्य, हस्ताक्षर, दासबोध इत्यादी स्पर्घांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन देऊन तयारी करून घेतली जाते आणि मुले बक्षिसेही मिळवतात.
शरीराची, परिसराची स्वच्छता याचे महत्व स्वच्छता दिन साजरा करून शिकविले जाते. इंग्रजी संभाषणाची, संवाद कौशल्याची आवड निर्माण व्हावी यासाठी गोष्टी, नाटके यांचे आयोजन केले जाते.
वार्षिक स्नेहसंमलेनातून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा अविष्कार दरवर्षी मोठ्या थाटात सादर केला जातो. तसेच हिंदी दिवस व संस्कृत श्लोक व गीते यातून या दोन्ही भाषांचीही ओळख करून दिली जाते.
एकूणच लहानग्यांसाठी आनंदी, सुरक्षित आणि पोषक वातावरण शाळेत असते. त्यामुळे मुलांचा बौद्धिक, शारिरीक तसेच भावनिक विकास होऊन मुले शाळेत येण्याचा आनंद घेतात.
विद्यार्थ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी, पालकांसाठी व्याख्याने व कार्यशाळा, ऑडिओ व्हिज्युअलसाठी प्रोजेक्टर इत्यादी सुविधाही शाळेत उपलब्ध आहेत. अनुभवी प्रशिक्षित आणि तत्पर शिक्षिका मुलांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेत आहेत.
परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालून उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचे, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व उज्जल भवितव्य घडविण्याचा पाया घालण्याचे कार्य पूर्व प्राथमिक शाळा अविरत करीत आहे.