पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि मुस्लिम सहकारी बँकेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांना डॉ. डी.वाय.पाटील युनिव्हर्सीटी (मुंबई)च्या वतीने डी.लिट् पदवी प्रदान करण्यात आली.
सोमवारी हा कार्यक्रम डॉ डी वाय पाटील यांच्या कोरेगाव पार्क (पुणे) निवासस्थानी पार पडला. कुलगूरू डॉ. शिरीष पाटील, विद्यापीठाचे संस्थापक डॉ. डी.वाय.पाटील, तसेच माजी न्या. जे डी इनामदार यांच्या प्रमुख उपस्थित हा पदवीप्रदान कार्यक्रम पार पडला.
विद्यापीठाच्या ११ व्या पदवीदान समारंभाला आकस्मित कारणाने पी ए इनामदार उपस्थित राहू न शकल्याने आज या विशेष पदवी दान समारंभाद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले .
‘पी ए इनामदार यांचे शैक्षणिक ,सामाजिक ,सहकार ,आरोग्य ,बांधकाम क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे . अल्पसंख्य -मागास समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले योगदान अत्यंत महत्वाचे आहे .सामाजिक सलोखा राखण्यात आणि एकात्मता वृद्धिंगत करण्यात ते अग्रेसर राहिले . या कार्याचा सन्मान म्हणून ही पदवी आम्ही प्रदान करीत आहोत . पी ए इनामदार यांना असा सन्मान यापूर्वीच मिळायला हवा होता .पी ए इनामदार यांनी त्यांचे शैक्षणिक कार्य आणखी पुढे नेऊन अभिमत विद्यापीठ काढावे ‘ असे उद्गार डॉ . डी . वाय . पाटील यांनी यावेळी बोलताना काढले .
‘कोल्हापूर येथे उच्च शिक्षण सुरु झाल्यापासून आमचे डॉ डी वाय पाटील यांचे स्नेहाचे संबंध आले ते त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे .प्रतिकूल परिस्थितीत शैक्षणिक कार्य पुढे नेण्याचा त्यांचा निर्धार मला भावला . मागास समाजाला शैक्षणिक ,आर्थिक आणि सामाजिक स्तरावर पुढे नेण्यासाठी केलेले काम मी आणखी पुढे नेईन . डॉक्टरेट सन्मानाबद्दल मी विद्यापीठाचे आभार मानतो . या प्रवासात कुटुंबीयांची ,सहकाऱ्यांची ,पुणेकरांची जी साथ लाभली त्यांचाही मी आभारी आहे ‘असे मनोगत पी ए इनामदार यांनी व्यक्त केले .
कुलगुरू डॉ . शिरीष पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ .परवेझ इनामदार, डॉ. रुकय्या इनामदार, इफ्तेकार इनामदार हे पी ए इनामदार यांचे कुटुंबीय देखील या समारंभाला आवर्जून उपस्थित होते .