विश्वराज हॉस्पिटल तर्फे डॉ. संजय बळवंत कुलकर्णी यांचा सत्कार
पुणे: नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेतर्फे 2016 चा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च असा डॉ. बी.सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार डॉ. संजय बळवंत कुलकर्णी यांना नुकताच मिळाला. त्याबद्दल विश्वराज हॉस्पिटलतर्फे डॉ. संजय बळवंत कुलकर्णी व ज्योत्स्ना कुलकर्णी यांचा सत्कार पुण्यातील नामवंत डॉक्टरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
यावेळी संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष व सुप्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. के.एच.संचेती, गुप्ते हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. संजय गुप्ते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण जामकर, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड व विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती राहुल कराड हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ. संजय बळवंत कुलकर्णी यांनी उपस्थितांसमोर आपला जीवनप्रवास कथन केला. तसेच त्यांच्या आयुष्यातील अनेक गमतीजमती व किस्से सांगितले. यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी डॉ. कुलकर्णीं यांनी घेतलेले कष्ट ऐकून उपस्थित डॉक्टरांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या.