पुणे- पुण्यात महापालिका आयुक्त पदावर राजेंद्र भोसले आल्यापासून महापालिकेत बदल्यांच्या कारभाराला अन शहरात समस्यांना ऊत आलाय हेच नाही कमी तर शहरात कोयते , बंदुका घेऊन फिरणारी लहान लहान मुले अन गुन्हेगारीचाही पूर आलाय , एकीकडे पावसाच्या पुराने वेढलेले , रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण झालेले, आणि वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या या पुण्यात आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान देखील येत आहेत .पुणेकरांनो सांगा बरे आता यावर तुम्ही काय म्हणाल? असा प्रश्न कोणी चॅनेलवाला विचारेल ही… पण आता त्या अगोदर पोलीस आयुक्तांनीच म्हणे महापालिका आयुक्तांना पत्र देऊन राष्ट्रपती येण्या अगोदर सारे रस्ते खड्डे बुजवून व्यवस्थित करा अशी विनवणी केली आहे.अगदी हाच मुद्दा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उचलला नाही तर नवलच नाही काय ? अगदी चंद्रकांत दादा मंत्री असूनही त्यांच्या मतदार संघातील रस्त्यांचे खड्डे त्यांना आमदार निधीतून बुजवायची वेळ आली कि हो .. तिथे तर स्वतः दादांच्या समवेत भाजपचे केंद्रातले मंत्री आणि खासदार आहेत तिथे हि अवस्था … मग काय .. विरोधकांनाही बहर येणारच … प्रशांत जगताप यांनी थेट राष्ट्रपतींना पत्रच लिहिलेय .. आणि या महोदया … आमच्या पुणे शहरात मुक्काम करा व पुणेकरांच्या यातना जाणून घ्या.. अशा स्वरूपाचे विशेष निमंत्रण दिले आहे.
अर्थात हडपसर साठी आमदारकीची लढाई सुरु केलेय जगताप यांच्या पत्र लिहिण्यामागे राजकारण असेलही ..पण असे आठवडाभर जर खरेच PM, प्रेसिडेंट कोणी पुण्यात येऊन राहिले तर मात्र पुणेकरांची खैर नाही …
दरम्यान जगताप यांनी असे सांगितले कि,’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात शहरातील खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागला. यानंतर राष्ट्रपती भवनाने पुणे पोलिसांना कर्मवीर पत्र लिहून खड्ड्यांबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.याच पार्श्वभूमीवर आपण राष्ट्रपतींना एक आठवड्यासाठी पुणे मुक्कामाचे निमंत्रण दिले आहे.दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात आपल्याला शहरातील खड्ड्यांचा प्रत्यय आला, याची दखल घेत त्यांनी प्रशासनास आवश्यक सूचना दिल्या याबद्दल त्यांचे मी तमाम पुणेकरांच्या वतीने आभार व्यक्त करणार आहे .
असो नेमके प्रशांत जगताप यांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटलेय काय ? ते आम्ही येथे जसेच्या तसे देत आहोत .. वाचा …
प्रती
श्रीमती द्रौपदी मुर्मूजी महामहिम राष्ट्रपती,
भारत सरकार राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली
विषय : पुण्यात एक आठवडा मुक्कामी येण्यासाठी निमंत्रण…..
महोदया, दोन दिवसांच्या पुणे दौन्यात आपल्याला शहरातील खड्ड्यांचा प्रत्यय आला, याची दखल घेत आपण प्रशासनास आवश्यक सूचना दिल्या याबद्दल आपले तमाम पुणेकरांच्या वतीने मनापासून आभार. महामहिम राष्ट्रपती जी, पुणेकर नागरिक आपल्या दैनंदिन जीवनात असंख्य यातना भोगत आहेत. रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी, टेकड्यांची फोडाफोडी याने पुण्याचा श्वास गुदमरतोय, अपघातांच्या भीतीने प्रत्येक पुणेकर जीव मुठीत घेऊन फिरतोय, मुळा मुठा नदीला प्रदूषणाचा विळखा, एका पावसात तुंबणारे रस्ते, दिवसाढवळ्या पुण्यातील रस्त्यांवर होणारे खून – दरोडे अशा अवस्थेत पुणेकर जगत आहेत. गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेले सत्ताधारी जनतेच्या वेदनांकडे लक्ष देण्यास तयार नाही. म्हणूनच, पुणेकरांच्या या वेदना अनुभवण्यासाठी आपण पुण्यात एक आठवडा मुक्कामी यावे ही नम्र विनंती ! कळावे !
आपला नम्र
(प्रशांत सुदामराव जगताप)