एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालक सौ. नीता केळकर यांचे आश्वासन
पुणे,: पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडून विजेची व नवीन वीजजोडण्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच वेगाने वीजयंत्रणेची सक्षमीकरण व विस्तारीकरण आवश्यक आहे. त्यामुळे महावितरण व महापारेषणच्या पुणे परिमंडल अंतर्गत प्रस्तावित नवीन उपकेंद्र व इतर सर्व पायाभूत यंत्रणेच्या उभारणीसाठी म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीच्या बैठकीमध्ये पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन या कंपनीच्या स्वतंत्र संचालक सौ. नीता केळकर यांनी दिले. तसेच वीजयंत्रणा उभारण्यासाठी जागेचा मोठा अडसर आहे. तो दूर करण्यासाठी इतर शासकीय विभागांकडे पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’मध्ये शुक्रवारी (दि. १३) आयोजित महावितरण व महापारेषणच्या पुणे परिमंडलातील विविध योजना व अंमलबजावणीचा आढावा घेताना सौ. केळकर बोलत होत्या. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (महावितरण) व श्री. अनिल कोलप (महापारेषण) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुणे परिमंडलातील विविध योजना व वीजयंत्रणेच्या आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. संचालक सौ. केळकर यांनी विविध मुद्द्यांवर उपस्थित सर्व मंडल व विभाग कार्यालयप्रमुखांशी थेट संवाद साधला व दर्जेदार ग्राहकसेवेसाठी व्यवस्थापनाकडून असलेल्या अपेक्षा त्यांनी जाणून घेतल्या.
या बैठकीत महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, पुणे परिमंडलामध्ये सन २०५० पर्यंतच्या वीजपुरवठ्यासाठी दर्जेदार व सक्षम वीजयंत्रणा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४ हजार ८३ कोटींच्या पायाभूत आराखड्यातील वीज यंत्रणेचे कामे प्रस्तावित आहेत. सोबतच विजेचे पारेषण करण्यासाठी २१ अतिउच्चदाब उपकेंद्रांची प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यापैकी ७ उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे. हे उपकेंद्र उभारण्याचे काम महापारेषणकडून करण्यात येणार आहे. तसेच अतिभारित वीजवाहिन्यांच्या विभाजनाचा १३६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून कामांनाही सुरवात झाली आहे. यासोबतच चाकण, तळेगाव, हिंजवडी, भोसरीसह इतर विविध औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन वीजयंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती मुख्य अभियंता श्री. पवार यांनी दिली.
महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप यांनी सांगितले की, विजेची पारेषण यंत्रणा आणखी सक्षम करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. विजेची मागणी वाढल्यानंतर अतिभारित अतिउच्चदाबाच्या काही पारेषण वाहिन्या बंद पडण्याचे प्रकार घडतात. ते यापुढे होणार नाही अशी पारेषण क्षमता ६०० मेगावॅटवरून १२०० मेगावॅटपर्यंत करण्याची उपाययोजना पूर्णत्वास आहे. तसेच पर्यायी वीजपुरवठ्यासाठी नवीन अतिउच्चदाबाच्या वाहिन्यांसह इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मर (आयसीटी)ची क्षमता दुप्पट करण्यात येत आहे. पारेषण यंत्रणेच्या सक्षमीकरणाच्या कामांमुळे सुमारे ८ ते १० वर्षांपर्यंत मागणीनुसार विजेचे पारेषण करण्यात कोणताही अडचण येणार नाही असे श्री. कोलप यांनी सांगितले. तसेच चाकण येथे नवीन ७६५ केव्ही अतिउच्चदाबाचे उपकेंद्र उभारण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली.
या बैठकीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, अँग्रीकल्चर मुंबईचे संचालक श्री. रमेश आरवाडे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. माधुरी राऊत, अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, अमित कुलकर्णी, विठ्ठल भुजबळ, संजीव नेहेते, अनिल घोगरे आदींसह सर्व विभाग कार्यालयप्रमुख कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.