श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाचे १३२ वे वर्षे
पुणे : श्री मोरया गोसावी यांनी भाद्रपद महिन्यातील मोरगावला सुरु केलली पालखी परंपरा परतीच्या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात दरवर्षी येते. यावर्षी देखील तब्बल १० दिवसांचा पायी पालखी सोहळा करुन उत्सव मंडपात आलेल्या पालखीचे स्वागत व आरती श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या विश्वस्त व पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच चिंचवड देवस्थानच्या विश्वस्तांनी श्री दगडूशेठ गणपतीची देखील आरती केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळा तर्फे उत्सवाच्या १३२ व्या वर्षी चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे आलेल्या पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, माजी विश्वस्त व श्री मोरया गोसावी यांचे वंशज विश्राम देव, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
श्री मोरया गोसावी विनायकी चतुर्थी ला मोरगावला जात असत. एकदा विनायकी चतुर्थीला गेले असताना मयुरेश्वराने त्यांना दृष्टांत दिला की आता तू वृद्ध झाला आहेस, तुझे कष्ट पाहवत नाहीत. त्यामुळे मीच तुझ्या घरी येईन. त्या दृष्टांताप्रमाणे चिंचवडमधील गणेश कुंडामध्ये क-हा नदीच्या तीरी मयूरेश्वराची मूर्ती सापडेल, असे सांगितले. त्याप्रमाणे प्रति मयुरेश्वर रुपाची मूर्ती सापडली. श्री मोरया गोसावी यांनी ती मूर्ती चिंचवडमधील मंगलमूर्ती वाडयात स्थापन केली.
तेव्हापासून दर माघ व भाद्रपद महिन्यात श्री मंगलमूर्ती (प्रति मयुरेश्वर) पालखीतून मोरगावला श्री मयुरेश्वराच्या भेटीला जाते. ही पालखी चिंचवड ते मोरगाव अशी माघ महिन्यात रथातून आणि भाद्रपद महिन्यात युवा कार्यकर्ते खांद्यावर पालखी घेऊन जातात. या दोन्ही वेळेला मोरगावला दिवाळीसारखे वातावरण असते. दर तृतीयेला पालखी मोरगावला पोहोचते. तेथे चतुर्थीला पूजा, आवर्तने, छबिना, पंचमीला अन्नदान असे कार्यक्रम झाल्यावर षष्टीला पालखी परतीच्या प्रवासाला निघते.
त्यानंतर पुण्यात श्री दगडूशेठ गणपती मांडवात आल्यावर दगडूशेठ गणपती ट्रस्टचे विश्वस्त व व्यवस्थापनामार्फत पालखीचे स्वागत व आरती केली जाते. तर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव हे श्री दगडूशेठ गणपतीची आरती करतात. हा सोहळा अनुभविण्यासारखा असतो. मोरगावला जाताना श्री कसबा गणपतीला देखील पालखीचे स्वागत होते आणि परतीच्या प्रवासात शेवटी दगडूशेठ गणपतीला पालखी येते.