उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा
पुणे-आरक्षण रद्द करण्याबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी देशाची आणि देशातील दलित समाजाची माफी मागावी, त्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही असा इशारा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.
राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्यामुळे दलित समाजात भीती निर्माण झाली असून, या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजपच्या वतीने आज राज्यभर आंदोलने करण्यात आली. याचा भाग म्हणून पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तेव्हा पाटील बोलत होते.
अनुसूचित जाती मोर्चा भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कांबळे, प्रदेश भाजपच्या चिटणीस वर्षा डहाळे, शहर भाजपचे सरचिटणीस पुनीत जोशी, राजू शिळीमकर, राहुल भंडारे, रवी साळेगावकर, महेश पुंडे, अतुल साळवे, किरण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर हे आरक्षण रद्द करतील असा गैरप्रचार काँग्रेसने केला. तो काही ठिकाणी प्रभावी ठरल्याने त्यांना यश मिळाले. परंतु त्यांचा हा खोटेपणा जनतेच्या लक्षात आला असून, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार जागा दाखवून देतील.”
पाटील पुढे म्हणाले, “बाबासाहेबांनी तयार केलेली घटना बदलावी लागणार नाही. महिलांना राजकीय आरक्षण मिळावे आणि सहा ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळावे अशा चांगल्या उद्देशाने भाजपने दोनदा घटना दुरुस्ती केली. परंतु काँग्रेसने घटना दुरुस्तीचा गैरवापर केला. देशावर आणीबाणी लादली, 20 लाख नागरिकांना तुरुंगात टाकले, मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली, तब्बल 40 वेळा लोकनियुक्त राज्य सरकारे बरखास्त केली. त्याचा आम्ही निषेध करतो.
राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी खोटा विमर्श (नरेटीव) निर्माण करण्यात हुशार आहेत. महाराष्ट्रातही मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका दुटप्पी आहे. आरक्षणाबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी. महाराष्ट्रातील जनता दूधखुळी नाही. या दुटप्पी भूमिकेची शहानिशा केल्याशिवाय राहणार नाही, असे ही पाटील म्हणाले.