पुणे, दि .१३ : राज्य शासनाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार असून संबंधितांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंडळामार्फत जीवनविमा व अपंगत्च विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, ६५ वर्षावरील ऑटो रिक्षा व मिटर्ड टॅक्सी परवानाधारक यांना निवृती सन्मान योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान, नवीन ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी खरेदी, गृह खरेदीसाठी कर्ज आदी योजना राबविण्यात येणार आहेत.
या योजनेंतर्गत नोंदणी प्रक्रिया परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. मंडळाच्या सभासदत्वासाठी अर्जदाराकडे राज्यामध्ये नोंदणी असलेल्या ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी अनुज्ञप्ती व बॅच असणे बंधनकारक राहील. नोंदणीकृत चालकांना मंडळाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून ओळखपत्र देण्यात येणार आहेत. चालकांनी योजनांच्या लाभासाठी जिल्हास्तरीय समितीकडे विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील.
या योजनांची सभासद नोंदणीकरिता ऑनलाईन प्रणाली विकासात करण्यात येत असून, संबधीत प्रणालीदार अर्जदार सभासदाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी प्रक्रिया, अटी व शर्ती, मंडळाच्या योजना आदींबाबत अधिक माहितीसाठी प्रादेशिक पारिवहन कार्यालय पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.