दिला शारीरिक स्वास्थ्य, पर्यावरण रक्षणाचा संदेश
शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी सायकलिंग उपयुक्त
- रक्षा खडसे यांचे मत; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅली
- राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा पुढाकार; अडीच हजार सायकलस्वार सहभागी
पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्याचे व पर्यावरपूरक जीवनशैलीचे महत्व जनमानसात रुजवण्यासाठी सायकल रॅली आयोजित करण्यात आली. कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते धर्मवीर संभाजी महाराज पुतळा, डेक्कन जिमखाना अशी ही सायकल रॅली निघाली. जवळपास अडीच हजार सायकलपटूंनी यात सहभागी होत ‘सायकल चालवा’चा नारा देत शारीरिक स्वास्थ्य व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारातून आयोजिलेल्या सायकल रॅलीचे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. प्रसंगी स्कायडाव्हर पद्मश्री शीतल महाजन, भारतीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, माजी नगरसेवक जयंत भावे, विश्राम कुलकर्णी आदी उपस्थित होते. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी सायकलिंग उपयुक्त असल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले.
रक्षा खडसे म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’साठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. सायकल चालवणे तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. मुलांमध्ये खेळाचे महत्व रुजण्यासाठी गावागावातून, शाळांमधून जागृती केली जात आहे. त्यांच्यात खेळभावना वृद्धिंगत करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाच्या माध्यामातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या पुढाकाराने झालेल्या सायकल रॅलीचा हा उपक्रम स्तुत्य आहे. पुणेकरांचा सायकल चालवण्याचा उत्साह पाहून मलाही ऊर्जा मिळाली आहे.”
सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून आयोजित केला जात आहे. सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. यंदाच्या सायकल रॅलीतही अडीच हजारांहून अधिक सायकलस्वारांनी सहभाग नोंदवला. यावेळी खडसे यांच्या हस्ते काही गरजू मुलामुलींना सायकलचे मोफत वाटप करण्यात आले. रॅलीत सहभागी प्रत्येकाला मेडल, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देऊन गौरविण्यात आल्याचे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नमूद केले.
शीतल महाजन व राहुल त्रिपाठी यांनीही सायकल चालवा, असे सांगत उपस्थितांना प्रोत्साहित केले.