शिरूर-महाराष्ट्रात केवळ दोनच साहेब आहेत. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार पवार . आमची पिढी या दोघांनाच साहेब मानते. त्यामुळे एखाद्या पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कुणी साहेब होत नाही, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना केली आहे.
अजित पवार यांनी खेड आळंदी येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना लालदिव्याची गाडी देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच आता आपणच साहेब असल्याची मिश्किल टिप्पणीही केली होती त्यांच्या या टीप्पणीचा संदर्भ देत अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी त्यांच्यावर निशाणा साधला.
अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रात दोनच साहेब आहेत. एक शरद पवार आणि दुसरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आमची पीढी या दोघांनाच साहेब म्हणते. केवळ एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब होणे नाही. त्यासाठीचा सांस्कृतिक व्यासंग असेल, सामाजिक व्यासंग असेल, दुसऱ्याच्या नव्हे तर स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहणे असेल किंवा संकट आल्यानंतर पळून न जाता संकटाला छातीवर झेलणे म्हणजे पवारसाहेब असणे आहे. हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने अजितदादांना सांगण्याची गरज नाही.
अजित पवार यांनी गुरुवारी तीर्थक्षेत्र आळंदीसह खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या जनसंवाद दौऱ्याला हजेरी लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महायुतीच्या जागावाटपात खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या. त्यांची गाडी ग्रामपंचायतीपासून आमदारपदापर्यंत पोहोचली आहे. आता लालदिव्यापर्यंत गाडी पोहोचवण्यासाठी साथ द्या. दिलीप मोहितेंना आमदार करा. खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो. आता आपल्याला दुसऱ्या कुणालाही सांगण्याची गरज नाही. आता आपणच साहेब आहोत.
उल्लेखनीय बाब म्हणजे अमोल कोल्हे यांनी मंगळवारीच अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. अजित पवार गटाची अवस्था सध्या येऊ नको म्हटले तरी कोणत्या गाडीत बसू अशी झाल्याची टीका त्यांनी केली होती. महायुतीच्या सर्व्हेमध्ये अजित पवारांना केवळ 12 जागा मिळतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे उर्वरित 28 आमदारांचे करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाल्यामुळे दादांनी बिहार पॅटर्ननुसार भाजपकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असेल, असे अमोल कोल्हे म्हणाले होते.