जागेची मालकी बदलली तरी वीजबिल थकबाकी भरणे अनिवार्य
पुणे, दि. ०९ सप्टेंबर २०२४: जागेची मालकी बदलली तरी वीजबिलांची थकबाकी भरणे अनिवार्य आहे. ही थकबाकी जागेच्या नवीन मालकाकडून किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार महावितरणला आहे. या पार्श्वभूमीवर थकीत वीजबिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेली घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर जागा थकबाकीमुक्त करण्याची संधी महावितरण अभय योजना २०२४ मध्ये उपलब्ध झाली आहे. यात पुणे परिमंडलातील २ लाख ५३ हजार ३७४ वीजग्राहकांना फायदा होणार असून मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे एकूण ७३ कोटी १४ लाख रुपये माफ होणार आहे.
थकबाकीमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना दि. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. पुणे परिमंडलातील २ लाख ५३ हजार ३७३ अकृषक ग्राहकांकडे सद्यस्थितीत ४७२ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यातील मूळ थकबाकीपोटी ३९८ कोटी ९९ लाख रुपयांचा भरणा केल्यास व्याजाचे ६९ कोटी व विलंब आकाराचे ५ कोटी ५ लाख असे एकूण ७४ कोटी ५ लाख रुपये माफ होणार आहेत.
वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन मालक किंवा ताबेदार यांच्याकडून थकबाकीची रक्कम वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे थकीत वीजबिलांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेली जागा थकबाकीमुक्त करण्यासाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले आहे.
मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळणार आहे. तर मूळ थकबाकीची ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा व्याजमुक्त हप्त्यांत भरण्याची सोय आहे. या योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना मागणीनुसार नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे. फ्रेंचायझीमधील ग्राहकांना सुद्धा लागू असलेल्या या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा.
महावितरण अभय योजनेचे ठळक मुद्दे –
» घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक जागेसाठी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची संधी व मागणीप्रमाणे त्वरित नवीन वीजजोडणी
» मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट
» मूळ थकबाकीची ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा व्याजमुक्त हप्त्यांत भरण्याची सोय.
» दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार वीजग्राहकांना संधी
» महावितरण अभय योजना दि. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार.