पुणे -(कोंढावळे फाटा, वेल्हे)
राज्यात सध्या राजकीय हवा बदलत आहे. सध्या महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचारामुळे जनता त्रासलेली असून, महिला अत्याचार, छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर मंत्र्यांनी केलेली विधाने पाहून जनता प्रचंड अस्वस्थ आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे बोलताना केला.
सुप्रिया सुळे भोर येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी आमदार संग्राम थाेपटे उपस्थित हाेते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, संघर्षाच्या काळात काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष या सर्व पक्षांचे कार्यकर्ते लाेकसभा निवडणुकीवेळी माझ्या पाठीशी उभी राहिले. बारामती लाेकसभा प्रचाराची खरी सुरुवात भाेर येथील विराट सभेने झाली. त्यानंतर आपली गाडी निरंतर धावत राहिली. त्यातून वेगळा आत्मविश्वास सर्वांना मिळाला. लाेकसभा निवडणुकीवेळी वेगळ्या प्रकारचा माेहाेल हाेता. आपल्यासाेबत जे उभे राहिले त्यांची कामे प्राधान्याने हाेतील.
या प्रकरणी एखाद्याने विराेध केला असेल तर त्यांचाही सन्मान केला जाईल. लोकसभेची काेणतीही कटुता मनात न ठेवता मी पुढील 5 वर्ष काम करत राहणार आहे. मला वर्षभरापूर्वी टीका झाल्यानंतर वाईट वाटत होते. पण आता निकालानंतर मला त्याचे काहीही वाटत नाही. कारण, आपल्यावर जेवढी टीका केली जाईल, तेवढेच जास्त मते आपल्याला मिळतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मतदार खूप हुशार असून ते बारकाईने सर्व कामावर लक्ष्य देत असतात. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक, साेसायटी, सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ, आमदार, खासदार, बँक असे सर्व माझ्याविरोधात हाेते. परंतु तरी देखील आपण निवडून आलाे. याचा अर्थ ताकद पदात नसून ती राज्यातील, देशातील मायबाप जनतेच्या हातात आहे. ती ताकद पदामध्ये जनता देत असते. अनेकजण यंदा विधानसभेला इच्छुक आहे. त्यांना माझे सांगणे आहे की, नेत्यामागे पडण्यापेक्षा जनतेसाेबत राहा ते तुम्हाला साथ देतील.
महाविकास आघाडीच्यावतीने भाेरची जागा ही काँग्रेस पक्ष ज्याला तिकिट देईल त्याच्या पाठीशी आम्ही आहे. विधानसभा निवडणुकीस ६० दिवसच राहिले आहेत. ऑक्टाेबरमध्ये हरियाणा साेबत महाराष्ट्राचे निवडणूक हाेणे अपेक्षित हाेते. परंतु निवडणुक आयाेगास थाेडा वेळ हवा हाेता. त्यामुळे त्यांनी वेळ वाढवून घेतला. मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले की, ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवडयात आचारसंहिता लागू हाेईल व १० ते १२ नाेव्हेंबर दरम्यान निवडणूक पार पडेल. कार्यकर्त्यांनी वाडीववस्तीवर जाऊन पक्षाचा प्रचार करणे महत्वाचे आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात सध्या राजकीय हवा बदलत आहे. सध्या महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचारामुळे जनता त्रासलेली असून, महिला अत्याचार, छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर मंत्र्यांनी केलेली विधाने पाहून जनता प्रचंड अस्वस्थ आहे. सरकारला वाटते सर्व नाती पैशानी जाेडली जातात. हे ५० खाेके, एकदम ओके सरकार असल्यामुळे त्यांना व्यवसाय व नात्यातील अंतरच समजले नाही हे दुर्देव आहे. पैसे नात्यात नसतात तर व्यवहारात असते व नात्यात प्रेम असते ते व्यवहारात नसते. महिलांना पैसे वाटप करण्यापेक्षा महिला सुरक्षा करणे महत्वाचे आहे, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.