यापूर्वी PM मोदींची छत्रपतींशी केली होती तुलना
मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूरत लुटीच्या मुद्यावरून राज्याच्या राजकारणात वादाचे काहूर माजले असताना आता स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनीही यासंबंधी एक वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी काही लोकांकडून आताच्या ईडी सारखी सक्तीची वसुली केली, असे ते म्हणालेत. त्यांच्या याविधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.आज गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळाला भेट दिली असता एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे आता भाजपाकडून त्यावर काय प्रतिक्रिया येणार, हे पाहावे लागेल. २२ जानेवारी रोजी जेव्हा अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. त्या सोहळ्यात बोलत असताना गोविंददेव गिरी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा श्रीमान योगी असा उल्लेख केला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरतेची लूट केली नसल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतरही फडणवीस यांनी आपण आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले. यामुळे राज्याचे राजकारण तापले असताना आता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवरायांच्या सूरत लुटीविषयी एक वेगळेच विधान केले आहे.
गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण राज्य हिंदूंचे आहे असे मानून राज्य करत होते. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेवेळी महाराजांना आर्थिक चणचण भासत होती. त्या स्थितीत जेव्हा त्यांना कोणताही उपाय दिसत नसे, तेव्हा ते आज ज्या प्रकारे ईडी सक्तीची वसुली करते, त्याच प्रकारे ते त्याकाळी काही लोकांकडून सक्तीची वसुली करत होते. हिंदी स्वराज्यासाठी जो कर भरायला हवा होता, त्याची वसुली महाराज सक्तीने करत होते.
गोविंददेव गिरी महाराजांच्या या विधानामुळे शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीच्या वादाला नव्याने फोडणी मिळाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गोविंददेव गिरी महाराजांनी असे वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख श्रीमान योगी अशी करून त्यांची तुलना एकप्रकारे शिवाजी महाराजांशी केली होती.
मला या परंपरेला पाहून केवळ एका राजाची आठवण येत आहे. त्या राजात हे सर्व गुण होते. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज एकदा मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी शैलमला गेले होते. त्यांनी 3 दिवस उपवास केला. 3 दिवस ते शिव मंदिरात राहिले. त्यानंतर ते म्हणाले, मला राज्य करायचे नाही, मला संन्यास घ्यायचा आहे. इतिहासातील हा एक विलक्षण प्रसंग होता. मी शिवाच्या आराधनेसाठी जन्मलो आहे. मला परत नेऊ नका, असा हट्ट त्यांनी धरला. तेव्हा महाराजांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावून परत नेले.
आज असाच महापुरुष आपल्याला मिळाला आहे. भगवती जगदंबेने त्याला हिमालयातून भारत मातेची सेवा करण्यासाठी परत पाठवले आहे. काही अशी ठिकाणे असतात जिथे आपले मस्तक आदराने झुकते. मला आज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामींची आठवण येत आहे. त्यांनी महाराजांचे वर्णन निश्चयाचा महामेरु असे केले होते. आज आपल्याला असाच श्रीमंत योगी मिळाला आहे, असे गोविंददेव गिरी महाराज म्हणाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज लुटारू नव्हते – फडणवीस
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नाही असा ठाम दावा केला आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली हे म्हणणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेवर दोनदा स्वारी केली. अल्लाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लूट म्हणतात. अब्दाली, तैमूर यांनी जे केले त्याला लूट म्हणतात. महाराजांनी तिथल्या सामान्य माणसांना हात तरी लावला का?
शिव इतिहासकारांनी माध्यमांना सांगितले की, महाराजांनी पत्र दिले होते. मुघलांचा खजिना आहे, तुम्ही तीन वर्षे युद्ध चालवले, त्यासाठी इतका खर्च आला. तुम्ही हा खर्च द्या अन्यथा मी स्वारी करेन. शिवरायांनी एक प्रकारे त्यांना नोटीसच पाठवली होती. खजिना वसूल केला, त्यानंतर महाराजांनी पावती दिली. याला लूट म्हणतात का? आपल्या बापाला लुटारू म्हणणारे हे कोण लोक आहेत? महाराजांनी कधीही सूरत लुटली नव्हती, असे ते म्हणाले.