महापौर मंजूषा नागपुरे : दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा
पुणे : पावसाने यंदा चांगलीच पाचावर धरण बसवल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे धरणांच्या परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याबाबत माहिती घेण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.
महापालिकेच्या पक्षनेत्यांची सोमवारी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीसंदर्भात माहिती देताना महापौर नागपुरे म्हणाल्या, धरणांमध्ये ३.६० टीएमसी एवढा पाणी साठा आहे. पावसाचा संपूर्ण जून महिना जवळपास कोरडा गेला आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा धरणांमध्ये आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने धरणांच्या क्षेत्रात कृत्रिम पाउस पाडण्याचा प्रयोग राबवता येईल का, याची माहिती घ्यायला सांगितले आहे. यासोबतच भामा आसखेड धरणातील पाणी शहरातील येरवडा, वडगाव शेरी परिसरात पुरविण्यात येते. या परिसरातही पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील पाणी पुरवठयाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे, असे नागपुरे म्हणाल्या. पालखी सोहळ्यासाठी नेहमी प्रमाणे दोन दिवस पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
पाणी कपात लागू केल्यानंतर प्रशासनाने वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव बंद करण्याचे आवाहन केले होते.
परंतू यानंतरही अनेक ठिकाणी वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलाव अद्यापही सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
याबाबत विचारणा केली असता सभागृह नेते गणेश बिडकर यांनी वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव बंद करावेत अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी, असे प्रशासनाला आदेश देण्यात आल्याचे सांगितले.
पालखी सोहळ्यासाठी दोन दिवस पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पालख्यांचा ९ आणि १० जून रोजी पुण्यात मुक्काम आहे.

