मुंबई- काल “६ सप्टेंबर रोजी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीमध्ये पोलिसांना गणेशोत्सवादरम्यान गणवेशात नृत्य करण्यास मनाई केली आहे. तसेच, असे करताना कोणता पोलीस अधिकारी वा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी त्यांच्या गणवेशाचा आदर राखला पाहिजे”, असं पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर या बैठकीत म्हणाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
सर्व गणेशभक्तांच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन पोलीस वर्ग रस्त्यावर खडा पाहारा देत आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता मुंबईत पोलीस आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत. यानुसार, त्यांना पोलीस गणवेशात गणेश मिरवणुकीत किंवा इतर ठिकाणी नृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ६ सप्टेंबर रोजी सुरक्षाव्यवस्था व पोलीस दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुंबईत पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान गणवेशावर नाचू नये, अशी सक्त ताकीद पोलीस आयुक्तांनी दिली आहे. यासंदर्भात एएनआयनं एक्सवर माहिती दिली आहे.