शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ व ठाकूर परिवाराच्या वतीने सन्मान
पुणे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ व ठाकूर परिवाराच्या वतीने कलासाधक व ज्येष्ठ पखवाज गुरु पांडुरग दातार यांना लोकशिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सनई चौघड्याच्या मंगल स्वरात पाषाण येथील पांडुरंग दातार यांचे निवासस्थानी अंगणात रांगोळी व दारावर मांगल्याचे तोरण बांधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या हस्ते ज्येष्ठ शिक्षक व शाहीर स्व. शशिकांत ठाकूर स्मरणार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानाचा शाहिरी फेटा, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर त्याचबरोबर शिरीष मोहिते, आनंद सराफ व अमर लांडे उपस्थित होते.
कलासाधाक व पखवाज गुरु पांडुरंग दातार यांनी स्व. भीमसेन जोशी, ज्येष्ठ कीर्तनकार स्व. बाबा महाराज सातारकर यांसारख्या अनेक ज्येष्ठ कलावंतांना पखवाज वादनाची साथ केली असून त्यांचे हजारो शिष्य महाराष्ट्रात आपल्या वादनाने कलासाधना करत आहेत. आजही पखवाज वादनाचे वर्ग पाषाण येथील निवासस्थानी दातार चालवतात. कार्यक्रमात दातार गुरुजींनी पखवाज वादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पराग ठाकूर यांनी तर सूत्रसंचालन आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केले.