नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2024
दक्षिण आफ्रिकी नौदलाच्या पाणबुड्यांवरील कर्मचाऱ्यांची अपघात किंवा दुर्घटनेच्या वेळी सुरक्षितता निश्चित करण्याबाबत अंमलबजावणी करारावर (आयए) भारतीय नौदल आणि दक्षिण आफ्रिकी नौदल यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे समुद्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यातील महत्त्वाचा मैलाचा टप्पा गाठला गेला आहे. भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आणि दक्षिण आफ्रिकी नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल माँडे लोबेस यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नौदल सुरक्षा आणि परस्पर सहयोगाप्रती वचनबद्धता या अंमलबजावणी कराराने अधोरेखित केली आहे. या करारांतर्गत, भारतीय नौदल आवश्यकता भासेल तेव्हा आपले खोल बुडी मारणारे बचाव वाहन (डीएसआरव्ही) वापरून सहकार्य करेल जेणेकरून दोन्ही नौदलांमधील सहकार्याला अधिक पाठबळ मिळेल. ही भागीदारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सागरी क्षेत्रातील संबंध दृढ करणारी आहे.