चार वर्षे गेलीच पण अजूनही चार वर्षे शिवाजीनगर स्थानक उपलब्ध असणार नाही
पीपीपी मॉडेलमध्ये नेमका रस कुणाला?
शिवाजीनगर बसस्थानक उभारण्यातील दिरंगाईला कारणीभूत कोण? पुण्यातील सर्वच स्थानीक आमदार गेली पाच वर्षे काय करत होते?
शिवाजीनगर बसस्थानकाची जागा सुमारे चार एकर इतकी आहे. त्यापैकी एक एकर जागेवर भुयारी मेट्रो मार्ग उभारण्यात आला आहे. मे २०२१ मध्ये मेट्रोचं काम पूर्ण झालं आहे. या दरम्यान शिवाजीनगर येथील बसस्थानक तात्पुरत्या स्वरुपात वाकडेवाडी येथील शासकीय डेयरीच्या जागेवर स्थलांतरीत करण्यात आलं होतं. परंतु मेट्रो स्थानकाबरोबरच शिवाजीनगर येथे बसस्थानकाचंही काम पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती मागील वर्षी मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली होती. तर स्थानिक भाजप आमदार शिरोळे हे याबाबत पाठपुरावा करत असल्याचा दावा करीत आले. पण याबाबतची वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी असून पुणेकरांची फसवणूक चालू आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
मेट्रोस्थानक बांधण्याच्या कारणास्तव शिवाजीनगर बस स्टॅन्ड पाडण्यात आले आणि तात्पुरते स्टॅन्ड जुन्या पुणे मुंबई हायवे वर हलवण्यात आले. आता त्याला आता साडेचार वर्षे झाली आहेत. परंतु नवीन स्थानक बांधणी संदर्भात अजूनही स्पष्टता असणारे करार व वेळापत्रक ठरलेले नाही असा दावा आप चे मुकुंद किर्दत ( Mukund Kirdat ) यांनी केला आहे.शिवाजीनगर येथे महामेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यातील कराराला तब्बल पाच वर्षे होऊन गेले आहेत.
15 ऑक्टोबर 2019 च्या कराराप्रमाणे शिवाजीनगर स्थानकाचे एकूण जागेपैकी तीनहजार चारशे स्क्वेअर मीटर एवढी जागा महा मेट्रो यांच्याकडे ताब्यात देणे व या ताबेदारीचा रेट हा 2019 मधील ( 21 कोटी पेक्षा अधिक) शासकीय दराप्रमाणे असेल असे ठरले होते.या करारात एमएसआरटीसी आणि प्रवाश्यांच्या हिताच्या बाबीचा अभाव आहे. एसटी महामंडळाने मेट्रोला दिलेल्या जमिनीच्या बदल्यात बांधकाम खर्च वळता करण्याचे ठरलेले होते. किमान शिवाजीनगर बस स्थानक महामेट्रोकडून बांधून घेणे अपेक्षित होते. मागील वर्षी एसटी महामंडळाच्या स्थापत्य विभागाच्या विद्या बिलारकर यांनी मे शशी प्रभू आर्कीटेकट, असोसिएट यांनी नकाशे सादर केले असल्याचे व एसटी महामंडळ हे स्थानक बांधणार असल्याचे सांगितले होते.
परंतु आता हे बांधकाम एसटी महामंडळ ऐवजी महामेट्रो करेल असा प्रयत्न चालू झाला आहे. याबाबतीत मुळच्या करारामध्ये स्पष्टता आणली गेली नसल्याने यामध्ये पीपीपी/ कमर्शियल तत्त्वावरती एसटी स्थानक बांधून त्याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध निर्माण करण्याचे काही जणांचे धोरण असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने तेव्हाच केला होता. या प्रकल्पात दिरंगाई झाली असल्याने प्रत्यक्षामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये जनतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनतेला मनस्ताप होतो आहे. तसेच वाकडेवाडी येथे वाहतूक कोंडी रिक्षा चालकांची अरेरावी इत्यादी प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.
आता पीपीपी, व्यावसायिक बांधकामामध्ये काही जणांचा रस असल्यामुळे हा प्रकल्प एसटी महामंडळ कडून काढून मेट्रो कडे देण्याचे घाटले आहे. दहा मजली बांधकाम करून यातील फक्त तळ मजला एसटी स्थानकासाठी असेल. यात लोकल कनेक्टीविटीसाठी स्थानिक बसेस म्हणजे पीएमपीएल साठी एक बसस्टंड शिवाय इतर काहीही सुविधा नाही. आधी महाविकास आघाडीमुळे हा प्रकल्प रखडला आता गेली दोन वर्षे महायुती यावर खेळते आहे. मेट्रो व एसटी महामंडळ यांच्यात अजून करारच झाला नसल्याने किमान चार वर्षे पुणेकरांना हे स्थानक उपलब्ध होणार नाही. त्यामुळे ट्रिपल इंजिन सरकारचे पुण्यातील सर्वच स्थानीक आमदार गेली पाच वर्षे काय करत होते असा सवाल आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत ( Mukund Kirdat ) यांनी केला आहे.