मुंबई-एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२० पासून मूळ वेतनात सरसकट ६५०० रुपये वाढ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले. त्यानंतर एसटी कामगार संयुक्ती कृती समितीने दुसऱ्या दिवशी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. संपाच्या पहिल्या दिवशी महामंडळाचा १५ कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २२ कोटींचा महसूल बुडाला.
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. संघटनांच्या कृती समितीची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन पगारवाढीचे आश्वासन दिले. त्यापूर्वी बुधवारी दिवसभरात एसटीच्या राज्यभरातील २५१ पैकी ९४ आगारांचे कामकाज पूर्णपणे बंद होते. तर ९२ आगारांमध्ये अंशत: कामकाज सुरू होते. मराठवाड्यातील सर्वाधिक २६ आगारांचे कामकाज बंद होते. ६५ आगारांत मात्र सेवा सुरळीत सुरू होती.
बुधवारी दिवसभरात राज्यातील ४० हजारांहून नियोजित फेऱ्यांपैकी २७,४७० फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे दिवसभर सुमारे ७० टक्के वाहतूक बंद होती. त्याचा प्रवाशांना फटका बसला. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून कोकणात ५ हजार बस सोडण्यात येणार आहेत. ४ सप्टेंबर रोजी १ हजार जादा बस सोडण्यात येणार होत्या. त्यापैकी मुंबई विभागातून ३०६ बस, पालघर विभागातून १५० बस मार्गस्थ झाल्या आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या, सातवा वेतन द्या, महागाई भत्त्याची थकबाकी द्या, मागील करारातील त्रुटी दूर करा, शिस्त व आवेदन पद्धतीत बदल, मेडिकल कॅशलेस योजना लागू करा या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते. यापैकी महत्त्वाच्या वेतनाच्या मागणीवर निर्णय झाला. इतर मागण्यांवरही लवकरच निर्णय घेतला जाईल. आंदोलनादरम्यान ज्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केेले आहे त्यांच्यावरील कारवाईही मागे घेतली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी आंदोलन केेले होते तेव्हा त्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये २५००, ४५०० आणि ५ हजार रुपये अशी पगारवाढ देण्याचा निर्णय झाला होता. मात्र कर्मचाऱ्यांना हा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी आंदोलन छेडले होते. भाजपचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनीही कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. आता मुख्यमंत्र्यांनी या सर्वच कर्मचाऱ्यांना सरसकट ६५०० रुपये पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला अाहे. म्हणजेच ज्यांना २०२१ मध्ये ५ हजार रुपयांची वाढ मिळाली होती त्यांनाही अधिकचे १५०० रुपये वाढ मिळेल. ज्यांना ४००० रुपये वाढ मिळाली होती त्यांना २५०० रुपये तर २५०० रुपये वाढ झालेल्या कर्मचाऱ्यांना आता ४ हजार रुपये जास्त मिळतील.