पुणे, दि. ३ : उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) या लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्द्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारत सरकारच्या नावाजलेल्या प्रशिक्षण संस्थेशी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) पुणे या संस्थेने सामंजस्य करार केला आहे. अमृत संस्थेकडून इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) च्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार असून इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन अमृतच्या निबंधक डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अमृत संस्थेच्या लक्षित गटातील उमेदवारांना उत्कृष्ट दर्जाचे निवासी तसेच अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून सदर प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च (प्रशिक्षण, राहणे व जेवण) अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार.
कोणत्याही शासकीय विभाग संस्था, महामंडळ यांच्या योजनेचा लाभ मिळत नसलेल्या महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकतील १८ ते ४० वयोगटातील पात्रताधारक युवक-युवती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत १५ निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच ३० अनिवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम हे आय.जी.टी.आर. (छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर, वाळूज, पुणे, नागपूर, कोल्हापूर या उपकेंद्रात दिले जाईल. १० वी उत्तीर्ण तसेच आय.टी.आय.,पदवीका, पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करु शकतात. इच्छूक उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात अधिवास असणे अनिवार्य आहे.
योजनेची सविस्तर माहिती www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेचा अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.