पुणे, दि. ०२ सप्टेंबर २०२४:पुणे महानगरपालिकेच्या शहरातील विविध पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे. खंडित वीजपुरवठ्याबाबत महानगरपालिकेने केलेल्या आरोपांची शहनिशा केल्यानंतर गेल्या जुलै व ऑगस्ट महिन्यापासून अतिवृष्टीच्या कालावधीत देखील पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरळीतच आहे असे निदर्शनास आले आहे. तर पर्वती जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पालिकेच्या अंतर्गत विद्युत यंत्रणेतील बिघाड व दुरुस्ती कामांसाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्याचा महावितरणशी कोणताही संबंध नाही असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले.
पुणे शहरातील पाणीपुरवठ्यासाठी महत्वाच्या पर्वती व तुकाईनगर पाणीपुरवठा योजनांसाठी महावितरणकडून एक्सप्रेस वीजवाहिनीद्वारे उच्चदाबाची प्रत्येकी एक वीजजोडणी पुणे महानगरपालिकेला देण्यात आली आहे. यामध्ये पर्वती जलशुद्धीकरण केंद्रामध्ये महापालिकेकडून अंतर्गत विद्युत विषयक दुरुस्ती कामे करण्यासाठी दि. ४ जुलैला ४ तास ३८ मिनिटे वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर दि. ५ ऑगस्टला महापालिकेच्या विद्युत यंत्रणेतील रोहित्रात बिघाड झाल्यामुळे २ तास २२ मिनिटे वीजपुरवठा बंद होता. त्यानंतर पुन्हा महापालिकेकडून अंतर्गत विद्युत विषयक दुरुस्ती कामे करण्यासाठी दि. ६ ऑगस्टला ६ तास ५२ मिनिटे वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तसेच याच कारणासाठी तुकाईनगर येथील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा ४ जुलैला महानगरपालिकेकडून २ तास बंद ठेवण्यात आला होता.
यासोबतच खडकवासला धरण, गणपती मठ वारजे, काकडे सिटी वारजे या ठिकाणी महावितरणकडून उच्चदाबाच्या पाच वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. खडकवासला जलकेंद्रात दि. ३ ऑगस्टला ५० मिनिटे तर दि. १३ ऑगस्टला १ तास ५ मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र त्यास महापालिकेच्या अंतर्गत विद्युत यंत्रणेतील बिघाड कारणीभूत होता. त्याचा महावितरणशी कोणताही संबंध नाही. तर रास्तापेठ विभाग अंतर्गत लष्कर पाणीपुरवठा केंद्राचा दि. २२ ऑगस्टला ३० मिनिटे आणि दि. २४ ऑगस्टला १५ मिनिटे वीजपुरवठा खंडित होता. तसेच पद्मावती, चतुःशृंगी येथील जलविद्युत केंद्रांचाही वीजपुरवठा गेल्या जुलैपासून खंडित झालेला नाही.
पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये मुसळधार पाऊस व पुरपरिस्थितीत देखील शहरातील सर्व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात महावितरणच्या उपाययोजनांना यश आले. यासाठी दैनंदिन इमेल किंवा व्हॉटस् ॲप ग्रुपद्वारे पलिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क ठेवला जात आहे. मात्र पालिकेकडून अंतर्गत विद्युत यंत्रणेची योग्य देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने त्याचा महावितरणच्या वीजवाहिनी व यंत्रणेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
जलकेंद्रातील अंतर्गत विद्युत यंत्रणेतील बिघाड किंवा देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवलेल्या वीजपुरवठ्याची जबाबदारी संबंध नसतानाही महावितरणवर टाकून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. जलकेंद्रांच्या खंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण जबाबदार असल्याचा पुणे महानगरपालिकेने केलेला आरोप अत्यंत चुकीचा असून शहनिशा केल्यानंतर त्यात कोणतेही तथ्य आढळून आले नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.