राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी लोकनेत्याचा कार्याचा गौरव; पत्नी डॉ. ज्योती मेटे स्वीकारणार पुरस्कार
पुणे: राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०२०-२१ करिता महाराष्ट्र विधानपरिषद ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ माजी विधानपरिषद सदस्य स्वर्गीय विनायकराव मेटे यांना जाहीर झाला आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांना सन २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट संसदपटू’ व ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण येत्या मंगळवारी (दि. ३ सप्टेंबर) दुपारी ३.३० वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी, शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
स्वर्गीय विनायकराव मेटे हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर समाजाच्या कल्याणासाठी अखंड झटणारे लोकनेते होते. समाजाच्या विकासासाठी त्यांची असलेली निस्सीम तळमळ आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय हे नेहमीच प्रेरणादायी ठरले आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघातून सामाजिक व राजकीय जीवनास सुरुवात करणाऱ्या मेटे यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होत मराठा आरक्षण विषय सातत्याने लावून धरला. १९९६ मध्ये विधान परिषद सदस्यपदी त्यांची प्रथम नियुक्ती झाली. त्यानंतर पाच वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांनी विधान परिषदेत काम केले. विधिमंडळात मराठा आरक्षणासह धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी, शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवला.
अवघ्या हिंदुस्थानचे दैवत असलेले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाची संकल्पना मांडून त्याचा अविरत पाठपुरावा केला. मागासवर्गीय तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मागासवर्गीय औद्योगिक संस्थांचे प्रश्न विधानभवनात मांडले. मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना उच्च व परदेशी शिक्षणाकरिता विद्यावेतन व मार्गदर्शनाकरिता सारथी या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेची संकल्पना मांडली व त्याद्वारे असंख्य विद्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला. पोलीस भरतीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. अशा संघर्षशील व्यक्तिमत्त्वाचा मराठा आरक्षणाच्या बाबतीत आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मुंबईकडे जात असताना दुर्दैवी निधन झाले. उभ्या हयातभर मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मेटे साहेबांचा शेवटही मराठा आरक्षणासाठीच झाला.