पुणे-पुण्यातील खराडी परिसरातील नदी पात्रात तीन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका खोली साठी झालेल्या वादातून या महिलेचा सख्खा भाऊ आणि तिच्या भावजयीने खून केला.या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे डोके आणि हात पाय वेगवेगळे करून मृतदेह नदी पात्रात फेकून दिला. सकीना खान असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी अशपाक खान आणि हमिदा या दोघांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेट परिसरात असलेल्या एका खोलीच्या मालकीतून हा संपूर्ण प्रकार घडला आहे. ही खोली सकीनाच्या नावावर होती. सकीनाचा भाऊ आणि वहिनी तिला घरातून निघून जाण्यासाठी सांगत होते. मात्र ती जात नसताना तिची हत्या करण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
दरम्यान, ज्या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस होता. त्या दिवशी आरोपींनी सकीना खानची राहत्या घरातच हत्या केली. त्यानंतर धारदार हत्याराने मृतदेहाचे तुकडे केले. डोकं वेगळं केलं, हात पाय देखील वेगळे केले. आणि त्यानंतर मृतदेह संगमवाडी येथील नदीपात्रात फेकून दिला. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकीना दिसत नसल्याने शेजाऱ्यांनी विचारणा केली असता ती गावाला गेल्याचे त्यांना सांगितले. मात्र, शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला.