श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड यांच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन
पुणे : सज्जन गड या एका नावातच सर्व समर्थ आपल्याला दिसतात. पण गडावर जे सत्तेत असतात ते सर्व सज्जन नसतात. त्यामुळे आजच्या काळात सज्जनांचे संघटन करणे, त्यांना सक्रिय करणे आणि राष्ट्रभक्तीच्या मार्गाला लावणे हे फार महत्त्वाचे आहे. आपल्यावर असलेले हे देशाचे दायित्व आहे. आताचा काळ बरा नाही. बांगालादेश मधील घटना, महिलांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना त्यामुळे सज्जनांचे संघटन करणे ही काळाची गरज आहे. राममंदिर झाले ठीक आहे, पण आता रामराज्य निर्माण करण्याचा निर्धार करा, असे आवाहन आचार्य श्री गोविंददेवगिरीजी महाराज यांनी केले.
श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड यांच्या वतीने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या राष्ट्रकार्यात संघर्षापासून मंदिराच्या उभारणी पर्यंत सक्रिय सहभाग असलेल्या आचार्य श्री गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री माणिकप्रभू संस्थानचे ज्ञानराज माणिकप्रभू महाराज व ज्येष्ठ समर्थ वंशज बाळासाहेब स्वामी यांच्या हस्ते आचार्य श्री गोविंददेवगिरीजी महाराज यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आचार्य श्री गोविंददेवगिरीजी महाराज बोलत होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान, चैतन्य गोधावाचे संस्थापक व वारकरी संप्रदायाचे ह.भ.प.मुकुंदकाका जाटदेवळेकर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. संस्थानचे विश्वस्त डॉ. अनंत निमकर, ऍड. महेश कुलकर्णी, ज्योत्स्ना कोल्हटकर, दीपक पाटील, केंद्रीय मठपती संघटन समिती अध्यक्ष संजय जहागीरदार आदी उपस्थित होते. तसेच या प्रसंगी दासबोध च्या पारायण प्रतीचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
आचार्य श्री गोविंददेवगिरीजी महाराज म्हणाले, आज माझा झालेला सन्मान हा श्री समर्थ यांचा प्रसाद म्हणून मी स्वीकारत आहे. रामदास महाराज यांना नेहमीच मी मातृ रूपात बघत आलोय. माणसाच्या जीवनात शौर्य पाहिजे ते शौर्य नसेल तर आपल्याला आपल्या घराचे समाजाचे संरक्षण करता येत नाही. निराशेच्या गरदेत महाराष्ट्र असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी संरक्षणाचे काम केले. परकीयांची आक्रमण होत असताना अनेक शासन गेली मात्र भारतामधील शिवरायांच शासन हे आजही दिमाखात उभे आहेत.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातल्या आपल्या संतांनी निर्माण केलेलया वाड्मयानी उभी केलेली लोकचळवळ ही शिवाजी महाराजांच्या कार्यात अत्यंत पूरक ठरली होती. त्यामुळे जे भाग्य आपल्या महाराष्ट्र भूमीला लाभले ते जगात कोणत्याही राज्याच्या भूमीला लाभलेले नाही. त्यामुळे पुढच्या पिढीतील शिवाजी महाराज तयार करायचे असतील तर सगळे वाङ्मय तपासल्यास आपल्याला एक मताने सांगावे लागेल की समर्थांच्या वाड्मया शिवाय पर्याय नाही. अशा प्रकारचे शिवाजी महाराज तयार केल्याशिवाय या देशाला भवितव्य नाहीये. संतांनी सहिष्णू महाराष्ट्र घडविला जे काम भारत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरम या घोषणेने केलं. राम मंदिराच्या उभारणीत जय श्री राम ने केले तेच काम जय जय रघुवीर समर्थ या घोषणेने त्या काळी समाजाला प्रेरीत करण्याचे काम केले.
ह.भ.प.मुकुंदकाका जाटदेवळेकर म्हणाले, वारकरी सांप्रदाय आणि रामदासी सांप्रदाय या दोन्हींना जोडण्याचे काम स्वामीजींनी केले आहे. त्यांचा मूळ गाभा समर्थांच्या जोडण्यात आपल्याला दिसतो. वारकरी सांप्रदाय ज्ञानाची परंपरा समर्थांच्या प्रेरणेने चालण्याचे अलौकिक काम केलं. ज्याप्रमाणे रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज यांची भेट झाली. सज्जन गडाचे नाव पूर्वी परळी गड होते. तेव्हा येथे शिवाजी महाराजांनी भव्य भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. यासाठी समर्थांश, शिवाजी महाराज, वामन पंडित, गागाभट्ट असे सर्वच होते. तेव्हा समर्थांनी शिवाजी महाराजांनी सांगितले की येथे आज सगळे सज्जन जमलेत, तेव्हा आज पासून या गडाला सज्जन गड असे नाव द्या.
ज्ञानराज माणिक प्रभू म्हणाले, भक्तीच्या धाग्यात वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि आचार्य महाराज देखील आहेत. साक्षात भगवंताने आपला कोष आचार्यांच्या हातात दिला आहे. भगवंतानीच त्यांचा हा सन्मान केला आहे. खरे तर संत म्हणजेच धर्म. तेच आपल्या वास्तव्याने पुण्य निर्माण करत असतात. आज गोविंददेवगिरीजी महाराज होते म्हणून राम मंदिर झाले, नाहीतर सरकारी काम कशी आणि कधी होतात, हे आपल्याला माहीत आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या यांच्या नावाने राम मंदिराला स्मृतीशिला अर्पण केल्याच्या प्रसंगाची आठवण करून देत नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गोविंददेव गिरी महाराजांनी कोरोनाच्या काळात गीता मंडळांच्या मार्फत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. नागरिकांचे मनोबल वाढावे यासाठी त्यांनी त्याकाळी केलेले काम मोठे आहे. यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला तरी कमी आहे. प्रत्येक वेळी त्यांच्या कामाचा वेगळा पैलू समोर येतो. अयोध्येतील राम मंदिर पाहायला मिळेल का? याची शंका होती. मात्र गोविंद गिरी महारांजानी आणि मोदी जींनी सहज करून दाखवले, असेही त्यांनी सांगितले. श्री रामदासस्वामी संस्थानचे अध्यक्ष भूषण महाराज स्वामी यांनी प्रास्ताविक केले.